मास्टरशेफ संजीव कपूर यांचा कोकणातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:32 IST2021-07-31T04:32:45+5:302021-07-31T04:32:45+5:30
रत्नागिरी : प्रसिद्ध मास्टरशेफ संजीव कपूर आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि ...

मास्टरशेफ संजीव कपूर यांचा कोकणातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
रत्नागिरी : प्रसिद्ध मास्टरशेफ संजीव कपूर आता पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या पूरग्रस्त भागात दररोज १५,००० थाळ्या पुरविणार असून, त्याचा प्रारंभ शुक्रवारपासून करण्यात आला आहे.
मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील चिपळूण आणि महाड भागाला जोरदार तडाखा दिला आहे. येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरविण्यासाठी मास्टरशेफ संजीव कंपूर यांनी शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारीतून चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात अन्न पुरविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून ही टीम शुक्रवारपासून (३० जुलै) पूरग्रस्तांना दररोज १५,००० थाळी ताजे जेवण पुरविणार आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने पूरस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे अनेकांचे जीव गेले, तर अनेकांची घरेही गमावली. चिपळूण आणि महाडही पूरग्रस्त आहेत. या भागातील लोकांना मूलभूत पोषणाच्या गरजा पुरविण्यासाठी अन्नदेखील मिळत नाही. माणुसकीच्या दिशेने टाकलेले एक लहानसे पाऊलदेखील अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल, अशी आम्हाला खात्री आहे. या पुढाकारातून आम्ही बाधित कुटुंबीयांच्या मूलभूत पौष्टिक गरजा भागविण्यासाठी चांगल्या दर्जाचे अन्न पुरवत आहोत. या भागातील तसेच इतरही पूरग्रस्तांना अन्न पुरवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे, अशी प्रतिक्रिया शेफ संजीव कपूर यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
कोरोनोने संपूर्ण देशाला विळखा घातला असतानाच शेफ संजीव कपूर हे ताज हॉटेल्स आणि वर्ल्ड सेंट्रल किचन यांच्या सहकार्याने कोरोनाविरुद्ध अखंडपणे काम करणाऱ्या हेल्थकेअर वॉरियर्सना ताजे पौष्टिक अन्न पुरवत आहेत. आतापर्यंत शेफ कपूर आणि वर्ल्ड सेंट्रल किचनचे शेफ जोस अँड्रेस यांनी दिल्ली, गुरुग्राम, अहमदाबाद, मुंबई, बंगलोर, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, गोवा, लखनौ आणि वाराणसी या शहरांसह इतर ठिकाणी १० लाखांहून अधिक थाळी जेवण पुरविले आहे.