चिपळूण : शहरातील गोवळकोट पेठमाप या गावांना जोडणाऱ्या वाशिष्ठी पुलाचे काम नगर परिषद प्रशासनातर्फे हाती घेण्यात आले असून, मुंबई, पुणेच्या धर्तीवर हा पूल होणार आहे. मात्र, या पुलासाठी शासनाकडून मंजूर झालेला निधी अद्याप प्राप्त न झाल्याने पुलाचे काम मुदतीत होईल की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.१९६०-६१ च्या दरम्यान शहरातील वाशिष्ठी नदीवर पूल बांधण्यात आला आहे. गोवळकोटसह अन्य गावांना जोडणारा हा शहरातील मुख्य पूल असून, २००५मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जुन्या पुलाला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा, अशी मागणी नगर परिषद प्रशासनाकडे करण्यात आली. त्यानुसार जुन्या पुलाच्या जवळच नवीन पूल बांधण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव तयार केला. पुलाच्या कामाला निधी मिळावा, यासाठी शासनस्तरावर पाठपुरावाही करण्यात आला. त्यानुसार राज्य शासनाकडून या पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. १३ जून २०१४मध्ये नवीन पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. मुंबई येथील एका कंपनीला हा पूल बांधण्याचे काम देण्यात आले आहे. जुन्या बाजारपुलाच्या नजीक नवीन पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले आहे. नदीमध्ये २४ पाईप्स टाकले जाणार आहेत. हे पाईप्स टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. १८ महिन्यात हा पूल पूर्ण करण्याची सूचना संबंधित ठेकेदाराला नगर परिषद प्रशासनातर्फे देण्यात आली आहे. मुंबई-पुणेच्या धर्तीवर हा पूल होणार असल्याने शहराच्या विकासात या पुलाच्या माध्यमातून भर पडणार आहे. ६ कोटी ९८ लाख २५ हजार रुपये खर्च करुन हा पूल बांधण्यात येणार आहे. सध्याच्या वाढणाऱ्या महागाईचा विचार करुन पुलाच्या कामाचे बजेटही वाढण्याची शक्यता आहे. राज्य शासनाकडून पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र, नगर परिषद प्रशासनाला हा निधी अद्याप प्राप्त न झाल्याने ठरवलेल्या मुदतीत हा पूल होईल अथवा कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. निधी अभावी काम रखडल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नगर परिषद येथे गेल्या महिन्यात पर्यटनासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत नगराध्यक्षा सावित्री होमकळस यांनी पालकमंत्री वायकर यांच्याकडे पुलासाठी मंजूर झालेला निधी लवकरच मिळण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. मंजूर झालेला निधी नगर परिषद प्रशासनाला वेळेत मिळाल्यास पुलाचे कामही ठरलेल्या मुदतीत होईल, या अनुषंगाने निधीसाठी आता खऱ्या अर्थाने पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे. (वार्ताहर)अतिवृष्टीत पुलाचे नुकसान : निधी मिळणार कधी?चिपळूण शहरातील गोवळकोट पेठमाप या गावांना जोडणाऱ्या पुलाचे अतिवृष्टीत नुकसान झाले. त्यानंतर या पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा निधी अद्याप प्राप्त न झाल्याने काम रखडले आहे. हा निधी मिळणार कधी असा सवाल होत आहे.पालकमंत्र्यांना साकडेगोवळकोट येथील पुलाचे काम निधीअभावी रखडले आहे. हा निधी मिळण्यासाठी चिपळूणच्या नगराध्यक्षांनी पालकमंत्री रवींद्र वायकर यांना साकडे घातले असून, हा निधी लवकर मिळण्याची मागणी केली आहे.
निधीअभावी बाजारपूल रखडला
By admin | Updated: November 13, 2015 23:39 IST