चिपळुणात पारावर मराठी रंगभूमी दिवस
By Admin | Updated: November 4, 2015 00:08 IST2015-11-03T21:52:25+5:302015-11-04T00:08:27+5:30
स्थानिकांचा सहभाग : आम्ही चिपळूणकर लोकचळवळीचा पुढाकार

चिपळुणात पारावर मराठी रंगभूमी दिवस
चिपळूण : आम्ही चिपळूणकर या लोकचळवळीतर्फे गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील प्रसिद्ध पारावर मराठी रंगभूमी दिवस साजरा केला जाणार आहे. या दिवशी सायंकाळी वैशिष्ट्यपूर्ण कलाविष्कार सादर होईल. चिपळुणातील काही तरुण आणि होतकरू कलावंत हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
सुमारे तीस वर्षांपूर्वी कोकणातील पहिले वाहिले आणि अद्ययावत ठरलेले चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र गेली दहा वर्षे बंद असल्याने चिपळुणातील कलावंत आणि रसिकांची गैरसोय झाली आहे. ज्या चिपळूणने मराठी रंगभूमीला कै. डॉ. काशिनाथ घाणेकर, कै. शंकर घाणेकर यांच्यासारखे महान कलावंत दिले. त्या चिपळुणात आज नाट्यगृह नाही, ही बाब चिपळूणकरांना सलत आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या मालकीचे हे सांस्कृतिक केंद्र रसिकांच्या सेवेत लवकरात लवकर रुजू व्हावे, यासाठी आम्ही चिपळूणकर चळवळीने पुढाकार घेतला. या लोकचळवळीच्या रेट्यामुळे सांस्कृतिक केंद्राचे रखडलेले काम चार महिन्यांपूर्वी सुरु झाले. हा प्रश्न लोकांसमोर मांडावा, या हेतूने आम्ही चिपळूणकरतर्फे केंद्रासमोरील पारावर सातत्याने विविध कार्यक्रम सादर केले जातात. पारावरचा लोकोत्सव, काव्य संध्या, कोकणरत्नांवरील चित्रफीत अशा कार्यक्रमांचा त्यात समावेश झाला. त्यामुळे एक प्रकारे हा पार सर्वसामान्य लोकांच्या अभिव्यक्तिचा मंच ठरत आहे. विशेष म्हणजे या चळवळीत चिपळूणमधील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत.
मराठी रंगभूमी दिनानिमित्त गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी या पारावर होणाऱ्या कार्यक्रमाच्या सादरीकरणासाठी चिपळूणमधील कलावंतांनी पुढाकार घेतला आहे. चिपळूणचा सुपुत्र, कलावंत ओंकार भोजने याचा त्यात समावेश आहे. याखेरीज आम्ही चिपळूणकरच्या सांस्कृतिक विभागातील ऋजुता खरे, शिवाजी शिंंदे, उमेश कुचेकर, निशिकांत पोतदार यांचा या आयोजनात पुढाकार आहे. यावेळी हे कलावंत आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मिळून एक अनोखा कलाविष्कार सादर करणार आहेत. दि. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पारावर साजरा होणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाला चिपळुणातील कलावंत आणि रसिक जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन आम्ही चिपळूणकरतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
एकशे बहात्तर वर्षांपूर्वी ५ नोव्हेंबर रोजी सांगली येथे विष्णूदास भावे लिखित सीता स्वयंवर हे संगीत नाटक सादर झाले. गायन समाज देवल क्लबतर्फे सादर करण्यात आलेले हे नाटक मराठी रंगभूमीवरील पहिले-वहिले नाटक ठरले. त्यानंतर मराठी रंगभूमीची दिमाखदार परंपरा रसिकांच्या सेवेत रुजू झाली. या दिवसाचे औचित्य साधून आम्ही चिपळूणकर लोकचळवळ हा दिवस साजरा करत आहोत.