मार्लेश्वरचा रमणीय धबधबा पर्यटकांना खुणावतोय!

By Admin | Updated: July 30, 2014 23:52 IST2014-07-30T23:52:03+5:302014-07-30T23:52:42+5:30

पावसाळ्यात गर्दी : श्रावणात परिसराने पांघरला हिरवा शालू

Maralishwar's delightful waterfalls are aiming for tourists! | मार्लेश्वरचा रमणीय धबधबा पर्यटकांना खुणावतोय!

मार्लेश्वरचा रमणीय धबधबा पर्यटकांना खुणावतोय!

मार्लेश्वर : संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे व श्रद्धास्थान असणाऱ्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वर तीर्थक्षेत्री असणारा धारेश्वर धबधबा सध्या पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. पांढरा शुभ्र फेसाळणारा हा धबधबा पर्यटकांच्या मनाला भुरळ घालत असून, पर्यटकांना खुणावत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या कुशीत एका गुहेमध्ये मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. त्यामुळे या देवस्थानची ख्याती सर्वदूर पसरली आहे. त्यातच मार्लेश्वर भक्तांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असते. देवस्थानच्या सभोवताली असलेले उंचच उंच ताशीव कडे सध्या पावसाळा असल्याने हिरवाईने नटले आहेत. त्यांनी जणू हिरवा शालू पांघरला आहे की काय, असे पाहिल्यावर वाटते.
मार्लेश्वर देवस्थान हे एका गुहेमध्ये वसले असून, ते स्वयंभू आहे. त्यामुळे मार्लेश्वराचे दर्शन घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक दरदिवशी तीर्थक्षेत्री येत असतात. मार्लेश्वर तीर्थक्षेत्र हे राज्य शासनाने ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले असल्याने येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात व येथील अल्हाददायक वातावरणात अक्षरश: आपले भान हरपून जाते. पावसाळ्यात तर येथील निसर्गसौंदर्य म्हणजे पर्यटकांसाठी वेगळी पर्वणीच असते. निसर्गसौंदर्य न्याहाळताना कड्यातून वाहत येणारे छोटे छोटे धबधबेही पर्यटकांना आकर्षित करीत आहेत.
तीर्थक्षेत्री असणाऱ्या बऱ्याच पायऱ्या सर करुन मार्लेश्वर मंदिरस्थळी गेल्यावर समोरच असणारा पांढराशुभ्र फेसाळणारा धारेश्वर धबधबा भाविक व पर्यटकांचे जणू स्वागतच करीत आहे, असे वाटते. सध्या हा धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. या धबधब्याचे मनमोहन रुप पर्यटक आपल्या डोळ्यात साठवून ठेवत आहेत. मार्लेश्वराचे दर्शन घेऊन झाल्यावर भाविक व पर्यटक धबधब्याचे रुप बऱ्याचवेळा न्याहाळत असतात. काही हौशी पर्यटक आपल्या मोबाईलमध्ये धबधब्याचा फोटो काढण्यात दंग असतात. धारेश्वर धबधबा व येथील निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटताना पर्यटकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहावयास मिळतो. उंच कड्यावरुन कोसळणारा धबधबा पाहताना व सभोवतालच्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेताना पर्यटक एका वेगळ्याच विश्वात तल्लीन होऊन जातात. सध्या श्रावण महिना सुरु असल्याने धबधबा व निसर्गसौंदर्याची मजा लुटण्यासाठी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री पर्यटकांचा ओघ वाढत आहे. (वार्ताहर)

Web Title: Maralishwar's delightful waterfalls are aiming for tourists!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.