पाणलोट समितीचे सचिव मानधनाविना
By Admin | Updated: October 2, 2014 00:14 IST2014-10-01T22:42:05+5:302014-10-02T00:14:45+5:30
उडवाउडवीची उत्तरे : तीन महिने दमडीही नाही

पाणलोट समितीचे सचिव मानधनाविना
असुर्डे : शासनाच्या दिरंगाई धोरणामुळे पाणलोट समितीच्या सचिवांवर उपासमारीची वेळ आली आहे़ याबाबत विचारणा केली असता निधी उपलब्ध नाही तसेच अहवाल वेळेत दिला नसेल, अशी कारणे तालुका कृषी अधिकारी पवार हे सांगत आहेत. त्यामुळे पाणलोट समितीच्या सचिवांमधून नाराजीचे सूर उमटत आहेत.
पाणलोट समितीच्या सचिवांचे मानधन जून २०१४पासून रखडले आहे. साधारणत: तीन हजार रुपये मानधन सचिवांना मिळते़ यामध्ये सचिवांना अनेक कामे करावी लागतात. त्या मोबदल्यात देखरेख तसेच नियमित नोंदी, जमा-खर्च या सर्व बाबींचा लेखाजोखा दर महिन्याच्या शेवटी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा करावा लागतो़
एवढे काम करुनही या सचिवांना तीन महिने मानधन नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. गेले अनेक महिने असाच प्रकार सुरू असल्याने तालुक्यातील पाणलोट समितीच्या सचिवांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.
केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट विकास समिती, कोकरेचे सचिव काशिनाथ जाधव यांनी मानधन अनेक महिने मिळत नसल्यामुळे सचिवपदाचा राजीनामा देत असल्याबाबतचे पत्र कृषी अधिकाऱ्यांना सादर केले आहे. अशाच प्रकारे अनेक गावांच्या पाणलोट समितीचे सचिव राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. कोट्यवधींच्या पाणलोट योजनेवर शासनाने कोट्यवधींचे आकडे दाखविले आहेत़ त्यामध्ये सर्व खर्चांच्या बाबीचा उल्लेख आहे. असे असताना गरीब व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सचिवांचे मानधन का निघत नाही ? असा सवाल या सचिवांमधून करण्यात येत आहे.
निवडणुकीच्या रणधुमाळीत अनेक पक्षांचे नेते दंग झाले आहेत.़ मात्र, या प्रश्नांकडे त्यांना लक्ष द्यायला वेळ नाही, अशी खंत पाणलोट समिती, कोकरेचे सचिव काशिनाथ जाधव यांनी व्यक्त केली़ यामध्ये केंद्र शासन, राज्य शासन की जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकारी दिरंगाई करत आहेत, याबाबत काहीच समजत नाही. (वार्ताहर)