निवडणुकीपेक्षा जपला माणूसकीचा ओलावा

By Admin | Updated: October 20, 2014 22:32 IST2014-10-20T21:29:03+5:302014-10-20T22:32:15+5:30

जगावेगळं ‘राजकारण’ : पराजित निकमांसाठी विजयी चव्हाणांच्या डोळ्यात पाणी

Mankind's moisture over election | निवडणुकीपेक्षा जपला माणूसकीचा ओलावा

निवडणुकीपेक्षा जपला माणूसकीचा ओलावा

सुभाष कदम -चिपळूण --माणूस हा नातीगोती, समाज आणि आपलेपणा जोपासणारा असतो. माणूस कुठेही गेला तरी आपल्यावरील संस्कार आणि विनयशीलपणा सातत्याने जपत असतो. काही माणसं विजयाने हुरळून जात नाहीत व अपयशाने खचतही नाहीत. मात्र या नात्यात ‘राजकारण’ शिरलं की त्यातील नातं संपतं आणि राजकारण तेवढंच शिल्लक राहतं. पण याचा विरूध्दार्थी प्रत्यय चिपळूण विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीच्या वेळी आला आणि राजकारणापलिकडे नात्यातील किंमत अधिक मोठी आहे, याचा आदर्श समोर आला. विधानसभा निवडणूका जाहीर झाली आणि या मतदार संघात शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेदवार शेखर निकम हे दोन नातेवाईक आमने-सामने उभे ठाकले. शेखर निकम यांचा भाचा सदानंद चव्हाण यांचा जावई आहे. चिपळूण मतदार संघात दोघांचीही समान ताकद आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत प्रचारात दोघांनीही कमालीचा संयम पाळला. मुळात जाहीर सभा घेणे टाळून प्रत्यक्ष भेटीवर जोर ठेवला. विभागीय किंवा वाडी बैठकीत त्यांनी आपल्यातील नात्याला मरू न देता आरोप करणे टाळले.
निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना निकम व चव्हाण शेजारीशेजारी बसले होते. चव्हाण यांची मुलगी निकम यांच्या भाच्याला दिली असल्याने त्यांचे घरगुती नाते आहे. मतमोजणी सुरु असताना अनेकवेळा उमेदवार एकमेकाकडे पाहातही नाहीत. परंतु, या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन करीत गप्पा मारल्या. आघाडी कमी अधिक होत होती, याबाबत चर्चा केली. एकमेकांचे मत आजमावले. चौदाव्या फेरीअखेर शेखर निकम आघाडीवर होते. तरीही संगमेश्वरपट्ट्यात आपला निभाव लागणार नाही. आपला साडेपाच हजारांनी पराभव होईल. परंतु, आपण चांगली लढत दिली. काळजी करु नका, पक्ष जोमाने वाढवू, असे निकम सांगत होते आणि आपले प्रतिस्पर्धी असलेल्या चव्हाण यांना धीर देत होते. असे विचित्र चित्र चिपळूणकरांनी पाहिले. सतराव्या फेरीला त्यांनी चव्हाण निवडून येणार असल्याने त्यांना शुभेच्छा देऊन मतमोजणी केंद्र सोडले. त्यानंतरही निकम यांनी अतिशय संयमी प्रतिक्रिया दिली. आपल्यापरीने जे करता येईल ते सर्व केले. यापुढे पक्ष वाढविण्यासाठी जोमाने प्रयत्न करु. सातत्याने कामात राहू, असे सांगितले. खरे तर उमेदवार एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करतात, दुषणे देतात. परंतु, असे काही घडले नाही.आपल्या विजयानंतर आमदार चव्हाण यांच्या पत्नी सीमा चव्हाण या त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आल्या असता चव्हाण पती-पत्नीला गलबलून आले. चव्हाण यांनी पेढा भरविला. त्यानंतरचा काही क्षण भावूक होता. निवडणूक प्रमाणपत्र स्वीकारल्यानंतरही आमदार चव्हाण त्यातून बाहेर आले नव्हते. भावनाविवश होत त्यांनी दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते. माझ्या एका डोळ्यात आनंदाश्रू, तर दुसऱ्या डोळ्यात दुखाश्रू आहेत. निकम माझे नातेवाईक आहेत. माझ्या मुलीला आनंद झाला असेल. परंतु, माझ्या जावयाना वाईट वाटले असेल. त्यांना संमिश्र आनंद झाला असेल, याची जाणीव मला आहे. निकम यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून काम केले आहे हे नाकारुन चालणार नाही. चिपळूण तालुक्यापेक्षा संगमेश्वर तालुक्याने आपल्याला अधिक साथ दिली, याबद्दल त्यांनी संगमेश्वर तालुक्याचे अधिक ऋण व्यक्त केले.
निकम यांचा पराभव अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. हे दोघांचेही यश आहे. दोघांनीही आपल्या नात्याची विण राजकारणापलिकडे जाऊन अधिक घट्ट केली. हेही नसे थोडके. राजकारणातील जय पराजय खिलाडूवृत्तीने त्यांनी स्वीकारला यातच त्यांच्या माणुसकीचे दर्शन झाले.

Web Title: Mankind's moisture over election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.