स्थानिक बाजारपेठेतील हापूस आंब्याचे भाव कोसळले
By Admin | Updated: May 23, 2016 00:17 IST2016-05-22T22:59:35+5:302016-05-23T00:17:46+5:30
हंगाम समाप्तीकडे : कॅनिंगच्या दरावरही परिणाम

स्थानिक बाजारपेठेतील हापूस आंब्याचे भाव कोसळले
रत्नागिरी : आंबापीक शेवटच्या टप्प्यात असून, मुंबई मार्केटबरोबर स्थानिक बाजारपेठेत दर कोसळले आहेत. कॅनिंगच्या दरावरही त्याचा परिणाम झाला आहे. पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांना झाडावरील आंबा उतरविण्याची संधी प्राप्त झाली आहे.मान्सूनपूर्व पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेवटच्या टप्प्यातील आंबा काढणे शक्य झाले आहे. कमी पर्जन्यवृष्टीमुळे दरवर्षीपेक्षा आंबा लवकर बाजारात आला. मात्र प्रमाण अत्यल्प होते. थंडीमुळे पुनर्मोहोर प्रक्रिया सुरू झाल्याने त्याचा फटका सर्वाधिक बसला. जेमतेम २० ते २५ टक्के आंबा उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले. एकूणच पीक कमी असताना सुरूवातीपासूनच दर स्थिर राहिले नाहीत. वाशी मार्केटबरोबर स्थानिक मार्केटमध्येही दर कोसळले. सध्या वाशी मार्केटमध्ये पेटीला दर ५०० रुपये देण्यात येत आहे. आंबा काढणीपासून वर्गवारी, पॅकिंग, हमाली, दलाली खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हातात मिळणारी रक्कम तूटपुंजी असल्यामुळे मुंबईला आंबा विक्रीस पाठवणे अशक्य झाले आहे. त्यामुळे स्थानिक बाजारात शेतकरी आंबा विक्री करत आहेत. रस्त्याच्या कडेलाही काही शेतकरी आंबा विक्री करीत आहेत.
सध्या स्थानिक बाजारात १०० ते २५० रुपये डझनाने आंबा विकण्यात येत आहे. कॅनिंगच्या दरातही घसरण झाली आहे. दर १८ ते २० रुपयांवर स्थिरावला आहे. जिल्हाभरातून दररोज हजारो टन आंबा खरेदी करण्यात येत आहे. यावर्षी आंबा उत्पादन कमी असल्याने कॅनिंगचे प्रमाण घटले आहे.
उष्मा वाढल्याने झाडावरच आंबा पिकू लागला आहे. कॅनिंग विक्रेते हा आंबा स्वीकारत नाहीत. त्यामुळे विक्रीबरोबर आमरस, मावा, आंबावडी तयार करण्यासाठी त्याचा वापर सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी घरगुती उत्पादनाकडे मोर्चा वळविला आहे. पर्यटकांकडून आंबा खरेदीबरोबर आंब्यापासून तयार केलेल्या पदार्थांना विशेष मागणी होत आहे.
छोट्या बिटक्या, रायवळ, पायरी केसर जातीचे आंबे बाजारपेठेत उपलब्ध आहेत. पावसाने अवधी दिल्यामुळे शेतकरी शेवटच्या टप्प्यातील आंबा काढून घेत आहेत. शोधणीचा आंबा काढणी सुरू आहे. येत्या आठवडाभरात हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे.
फळप्रक्रिया केंद्रात मात्र सध्या कामाची लगबग दिसून येत आहे. आमरस, आंबावडी, छुंदा, लोणचे, मुरांबा यांसारखे पदार्थ तयार केले जात आहेत. फळप्रक्रिया केंद्राकडून आंबा कमी किमतीत खरेदी केला जात आहे. मात्र, त्यापासून तयार केलेल्या उत्पादनाच्या विक्रीतून अधिक पैसे उद्योजकाला उपलब्ध होणार आहेत. यावर्षी आंबा उत्पादन घटल्यामुळे प्रक्रिया उत्पादनातही घट झाली आहे. (प्रतिनिधी)