माणगावच्या तरूणाचा रूळावर सापडला छिन्नविछिन्न मृतदेह
By Admin | Updated: March 20, 2017 16:49 IST2017-03-20T16:49:46+5:302017-03-20T16:49:46+5:30
रायगड जिल्ह्यातील रहिवासी, संगमेश्वरजवळील उक्षीजवळील दुर्घटना

माणगावच्या तरूणाचा रूळावर सापडला छिन्नविछिन्न मृतदेह
आॅनलाईन लोकमत
देवरूख, दि. २0 : संगमेश्वर तालुक्यातील उक्षी येथील रेल्वे रूळावर राकेश दळवी या तरूणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. राकेश रायगड जिल्ह्यातील माणगावचा रहिवासी आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली आहे.
रेल्वेरूळाची पाहणी करत असताना शनिवारी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास ट्रॅकमनला रूळावर मृतदेह असल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबतची खबर संगमेश्वर रेल्वे स्थानकात दिली. याची दखल घेत रेल्वे अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याचे दिसून आले. रेल्वेमधून पडून या तरूणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
मृतदेहाच्या जवळ असलेल्या मोबाईलवरून ओळख पटण्यास मदत झाली. हा मृतदेह माणगाव येथील राकेश दळवी यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी सायंकाळी उशिरा दळवी यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र दळवी हे कोठून कोठे प्रवास करत होते, कोणत्या रेल्वेने प्रवास करत होते याची माहिती सायंकाळी उशिरापर्यंत मिळू शकलेली नाही. अचानक घडलेल्या दुदैवी घटनेमुळे दळवी कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)