मंडणगड नगरपंचायत निवडणूक १ नोव्हेंबरला
By Admin | Updated: September 28, 2015 23:52 IST2015-09-28T21:50:17+5:302015-09-28T23:52:21+5:30
कार्यक्रम जाहीर : १० ग्रामपंचायतींची २८ आॅक्टोबरला मतदान

मंडणगड नगरपंचायत निवडणूक १ नोव्हेंबरला
रत्नागिरी : मंडणगड येथील नवनिर्मित नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल दीर्घ प्रतीक्षेनंतर एकदाचे वाजले आहेत. त्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यासाठी २८ आॅक्टोबरला मतदान होणार आहेत. राज्य निवडणूक आयुक्त स. द. सहारिया यांनी सोमवारी मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
जिल्ह्यातील नऊ पैकी आठ तालुक्यांमधील मुख्य ठिकाणी नगरपरिषद किंवा नगरपंचायत आहे. केवळ मंडणगडमध्येच ग्रामपंचायत अस्तित्वात होती. काही महिन्यांपूर्वी मंडणगड नगरपंचायतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली. तर भाजपने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिकाही जाहीर केली. त्यामुळे ही निवडणूक कधी होणार, ही उत्सुकता मंडणगडवासीयांना लागून राहिली होती. अखेर सोमवारी राज्य निवडणूक आयुक्त स. द. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख जाहीर केली. त्यामुळे येत्या १ नोव्हेंबरला या नगरपंचायतीसाठी मतदान होणार असून, २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
आठ जिल्ह्यांतील एकूण १८९ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रमही जाहीर करण्यात आला असून, त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. त्यासाठी येत्या २८ आॅक्टोबरला मतदान होणार आहे. (प्रतिनिधी)