अंधांचे जीवन प्रकाशमय होण्यासाठी नेत्रदान करा

By Admin | Updated: July 27, 2015 00:35 IST2015-07-26T22:21:13+5:302015-07-27T00:35:55+5:30

अण्णा शिरगावकर : सह्याद्री निसर्गमित्रकडे नेत्र, देहदानाचे संकल्पपत्र सुपूर्द...

Make eye donation to blind people's lives | अंधांचे जीवन प्रकाशमय होण्यासाठी नेत्रदान करा

अंधांचे जीवन प्रकाशमय होण्यासाठी नेत्रदान करा

चिपळूण : एक सामाजिक बांधिलकी म्हणून अनावश्य रुढी परंपरा मोडून टाका. वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून हजारो अंधांच्या जीवनात प्रकाश टाकण्यासाठी नेत्रदान करा. मृत्यूनंतरसुध्दा समाजाच्या उपयोगासाठी देहदान करा असे आवाहन इतिहासतज्ज्ञ व सागरपुत्र संस्थेचे संस्थापक अण्णा शिरगावकर यांनी केले आहे. सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेकडे शिरगावकर यांनी स्वत:चे नेत्रदान व देहदान संकल्पपत्र सुपूर्द केले यावेळी ते बोलत होते. शिरगावकर यांनी पत्नी नंदिनी शिरगावकर यांच्या मृत्युपश्चात मुलीच्या हस्ते अग्नीसंस्कार केले तर उत्तरकार्यावर भरमसाठ खर्च करण्याऐवजी त्यांनी अपंगांसाठी काम करणाऱ्या संस्था, मुलींचे वसतीगृह अशा सामाजिक कार्याला मदत केली. त्याचप्रमाणे मृत्युपश्चात देहही सत्कारणी लागावा यासाठी त्यांनी देहदान व नेत्रदान नोंदणी केली आहे. देह ही नश्वर गोष्ट आहे तर डोळे हे मृत्यूनंतरही उपयोगात येणारा अवयव आहे. पुढील पिढीला तो दृष्टी देऊ शकतो, त्यामुळे नेत्रदानाबाबत जागृती गरजेची असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
वैद्यकीय शास्त्राच्या प्रगतीसाठी व वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शरीर रचनेचा अभ्यास आवश्यक असतो. एका वैद्यकीय महाविद्यालयाला सर्वसाधारणपणे वर्षाला ३० ते ४० देह अभ्यासासाठी आवश्यक असतात. देहदात्यांमार्फत दरवर्षी अंदाजे २५ ते ३० देह उपलब्ध होतात. परंतु, ते पुरेसे ठरत नाहीत. देहदानाबद्दल जनजागृती होणे आवश्यक आहे. सह्याद्री निसर्ग मित्र व वालावलकर रुग्णालय, वालावलकर वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयोगाने देहदानाचे काम सुरु आहे असे संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे यांनी सांगितले. (वार्ताहर)

७ लाख ८० हजार अंध भारतात आहेत. त्यातील १ लाख ५० हजार नेत्रदानाअभावी अंध आहेत. त्यामध्ये दरवर्षी ४० ते ५० हजारांची भर पडत असते. प्रतिवर्षी केवळ ५० हजार नेत्रदान होते. दीड लाख कॉर्नीयाची भारताला गरज आहे. या नेत्रदानाबरोबरच देहदान करणाऱ्यांनी अधिक माहितीसाठी सह्याद्री निसर्ग मित्र युनायटेड पार्क मार्कंडी येथे संपर्क साधावा असे आवाहन उदय पंडित यांनी केले आहे.


देहदात्यांमार्फत दरवर्षी २५ ते ३० देह उपलब्ध होतात.
देहदानाबद्दल जागृती नसल्याने अडचण.
वर्षाला महाविद्यालयाला लागतात ३० ते ४० देह.

Web Title: Make eye donation to blind people's lives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.