विकासकामांचे अंदाजपत्रक बनवा
By Admin | Updated: December 23, 2015 01:29 IST2015-12-23T01:06:49+5:302015-12-23T01:29:56+5:30
राधाकृष्णन बी. : खेरशेत येथे प्रलंबित विकासकामांची जिल्हाधिकारी यांच्याकडून पाहणी

विकासकामांचे अंदाजपत्रक बनवा
अडरे : चिपळूण तालुक्यातील पाचांबे - पुनर्वसन खेरशेत येथील प्रलंबित विकासकामांची जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पाहणी केली. लघुपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित विकासकामांचे अंदाजपत्रक बनवण्याची सूचना त्यांनी केली आहे. तसेच प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत येत्या काही दिवसात बैठकीचे आयोजन केले जाईल, असे आश्वासन प्रकल्पग्रस्तांना दिले. यामुळे आगामी काळात गडनदी प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. याबाबत माजी खासदार नीलेश राणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत तसेच प्रकल्पग्रस्त पाठपुरावा करीत आहेत.
संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पासाठी पाचांबे येथील ग्रामस्थांचे खेरशेत येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, खेरशेत येथे या ग्रामस्थांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नाहीत. या ठिकाणी गटारे, विहीर, सार्वजनिक शौचालये, वीज, संरक्षक भिंत आदी कामे करण्यात आली. मात्र, ही कामे निकृष्ट दर्जाची झाल्याने शासनाच्या निधीची चुराडा झाला. तसेच येथील ग्रामस्थांकरिता सुमारे पाच किलोमीटरवरून नळपाणी योजना राबवण्यात आली आहे. या योजनेतील पाईपलाईनला गळती असल्याने पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. शिवाय प्रकल्पग्रस्तांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. प्रकल्पग्रस्त या प्रलंबित विकासकामांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. यानंतर प्रकल्पग्रस्तांनी तालुकाध्यक्ष सावंत यांच्या नेतृत्त्वाखाली हा विषय माजी खासदार नीलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिला. याची दखल घेऊन सावंत यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना निवेदन दिले. अपर जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्तांची बैठक बोलावली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली नाही. यानंतर माजी खासदार राणे यांनी प्रकल्पग्रस्तांसह काँग्रेसच्या शिष्टमंडळासमवेत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांची पाहणी करू, असे सांगितले. यानुसार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी कामांची पाहणी केली.
यावेळी उपजिल्हाधिकारी अजित निगुडकर, तहसीलदार वृषाली पाटील, संगमेश्वर-देवरुखच्या तहसीलदार वैशाली पाटील-माने, पाचांबे ग्रामविकास कमिटीचे शांताराम बल्लाळ, विलास गायकवाड, पंकज सावंत, जयराम निकम, वसंत भुरावणे, सुभाष बल्लाळ, बाबासाहेब गायकवाड, विजय गायकवाड, उत्तम गायकवाड, जयराम निकम, संतोष सावंत, अर्जुन जाधव, केशव घाडगे, प्रकाश बल्लाळ, सचिन जाधव, किशोर बल्लाळ, पांडुरंग जाधव, विठ्ठल जाधव, अमृत सावंत, मारुती बल्लाळ, काँग्रेसचे प्रवक्ते प्रभाकर जाधव, खेर्डी जिल्हा परिषद गट अध्यक्ष अमित सावंत, गुलजार कुरवले, सिध्दार्थ कदम, नीलेश भडवळकर, दिनेश गुढेकर, पंचायत समिती सदस्य चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
लवकरच बैठक : काँंग्रेसकडून पाठपुरावा
प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार.
ग्रामस्थांना मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत.
निकृष्ट दर्जाची कामे झाल्याने शासनाच्या निधीचा चुराडा.
पाच किलोमीटरवरून नळपाणी योजना.
संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण प्रकल्पासाठी पाचांबे येथील ग्रामस्थांचे खेरशेत येथे पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र, याठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. यासाठी काँग्रेसने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता.
प्रश्न प्रलंबित
पुनर्वसनानंतर मूलभूत सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. पुनर्वसनानंतर प्रलंबित प्रश्नांसाठी ग्रामस्थांना वारंवार खेटे मारावे लागत आहेत.