महावितरणचा हायटेक प्रकाश

By Admin | Updated: July 2, 2016 23:34 IST2016-07-02T23:34:34+5:302016-07-02T23:34:34+5:30

अत्याधुनिक तंत्रज्ञान : ग्राहक, कर्मचाऱ्यांसाठी चार अ‍ॅप

Mahitevan's Hi-Tech Lighting | महावितरणचा हायटेक प्रकाश

महावितरणचा हायटेक प्रकाश

मेहरुन नाकाडे ल्ल रत्नागिरी
बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिल्या आहेत. आता या सर्व सेवा महावितरणने मोबाईलवरही उपलब्ध करून दिल्या आहेत. महावितरणशी संबंधीत सेवा ग्राहकांना सहज उपलब्ध व्हाव्यात या उद्देश्यातून महावितरणच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी उपयुक्त चार अ‍ॅप तयार केले असून, ते सुरूही करण्यात आले आहेत.
दरमहा वीजबिल भरण्यासाठी रांगेत उभे राहून ग्राहकांचा अधिक वेळ वाया जात असल्याने महावितरणने स्वयंचलित वीजबिल भरणा केंद्र सुरू केले. मात्र, या केंद्रावर ग्राहकांची होणारी गर्दी विचारात घेता महावितरणने आॅनलाईन वीजबिल स्वीकारण्यास प्रारंभ केला. आता तर बिल तयार झाल्यापासून भरल्यानंतरचे संदेश तसेच अन्य सूचना देण्यासाठी महावितरणने अ‍ॅप तयार केले असून, त्याचा वापर ग्राहकांनी सुरू केला आहे.
महावितरण कंपनीतर्फे राज्यातील २ कोटी ४० लाख ग्राहकांसाठी हे अ‍ॅप तयार करण्यात आले असून, त्याद्वारे वीजबिल तयार झालेपासून ते भरण्यासाठीचे संदेश तसेच भरल्यानंतरचे संदेश तसेच विविध सुविधांची माहिती या अ‍ॅपद्वारे दिली जाणार आहे.
वीजबिल भरण्यासाठी नेटबँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड सोबतच मोबाईल वॅलेट, कॅशकार्डचा वापर करता येतो. यापुढे ग्राहकांना मोबाईलवर वीजबिलाचे संदेश पाठवले जाणार आहेत. त्यासाठी रत्नागिरी परिमंडलातील प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांचे नंबर मिळविण्याचे काम सुरू झाले आहे. ग्राहकांना मोबाईल क्रमांक, ई -मेल आयडी नोंदविण्याची व ते अद्ययावत करण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये उपलब्ध आहे.
ज्या ग्राहकांचे रिडींग महावितरणला मिळालेले नाही, अशा ग्राहकांना कंपनीकडून नोंदविलेल्या मोबाईलवर संदेश देण्यात येणार आहे. त्या ग्राहकांना मीटरचा फोटो काढून रिडींग नोंदविण्याची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे चुका कमी होऊन ग्राहक तक्रारी कमी होतील, असा महावितरणचा होरा आहे.
कर्मचाऱ्यांसाठी तयार केलेल्या अ‍ॅपद्वारे वेळेची बचत होणार आहे, तसेच ग्राहकांचा त्रासही वाचणार आहे. अभियंते, जनमित्र यांना विविध कामांसाठी फिरावे लागते, सर्वेक्षण करावे लागते.
त्यांना आता फिल्डवरील महत्वाच्या नोंदी कागदावर करण्यापेक्षा मोबाईलद्वारे करता येणार आहेत. त्यामुळे वेळ व श्रम दोन्हीही वाचणार आहेत. या कामासाठी तीन स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहेत. नवीन कनेक्शन अ‍ॅपद्वारे उच्चदाब, लघुदाब वर्गवारीतील सर्व जोडण्या देण्यात येणार आहेत.
नवीन खांब, वायरची आवश्यकता, मीटर क्रमांक नोंदविता येईल. तांत्रिक कारणामुळे एखादी जोडणी देता येत नसेल तर त्याचे सबळ कारण अ‍ॅपमध्ये नोंदवावे लागेल. प्रलंबित जोडण्यांची संख्यादेखील यामुळे दिसणार आहे.
मीटर रिंडीग अ‍ॅप जनमित्र तसेच रिंडींग घेणाऱ्या एजन्सीसाठी उपयुक्त ठरणार आहे. मोबाईलद्वारे काम होणार असल्याने वेगळ्या कॅमेराची गरज भासणार नाही. फिडर, रोहित्र, ग्राहकांचे मीटर रिंडींग या अ‍ॅपद्वारे होणार आहे. परंतु, रिडींगसाठी प्रत्यक्ष त्याठिकाणी जाणे आवश्यक आहे.
कर्मचारी मित्र अ‍ॅपद्वारे तातडीच्या तसेच देखभाल दुरूस्तीच्या कामांसाठी वीजपुरवठा बंद करणे आवश्यक असल्यास शाखा अभियंत्याला त्याची नोंद अ‍ॅपमध्ये करता येईल. ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा बंद राहणार आहे, त्यांना मोबाईल संदेश पाठविण्याची सोय यामध्ये आहे. वीज बंद ठेवण्याचे नेमके कारण समजल्यामुळे ग्राहकांचा रोष कमी होण्यास मदत होईल. भार व्यवस्थापन, लोकेशन कॅप्चर, फिडर रिडींग, डिस्कनेक्शन मॅनेजमेंट या अन्य पर्यायाचाही वापर करता येणार आहे.

महावितरणने मोबाईल अ‍ॅपचा शुभारंभ केला आहे. एकूणच यामुळे ग्राहकांचा वेळ वाचणार आहे. ग्राहकांसाठीचे हे अ‍ॅप गुगल प्लेस्टोअर, अ‍ॅपल अ‍ॅपस्टोअर, विंडोज स्टोअर तसेच महावितरणच्या ६६६.ेंँं्िर२ूङ्मे.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामध्ये सेवांबद्दलचा अभिप्रायही नोंदविता येईल. कर्मचाऱ्यांसाठी तीन स्वतंत्र मोबाईल अ‍ॅप विकसित केले असून, ते कंपनीच्या अंतर्गत नेटवर्कवर उपलब्ध केले आहेत.
- कांचन आजनाळकर,
मुख्य अभियंता, कोकण परिमंडल

Web Title: Mahitevan's Hi-Tech Lighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.