महिपतगडाची वाट बिकट
By Admin | Updated: September 5, 2015 23:54 IST2015-09-05T23:53:53+5:302015-09-05T23:54:12+5:30
खेड तालुका : रस्त्यावर ५ कोटी ५० लाखांचा खर्च

महिपतगडाची वाट बिकट
खेड : शिवत्रपतींच्या पराक्रमाने स्मरणात राहिलेल्या खेड तालुक्यातील ंमहिपतगड या किल्ल्यावर जाण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याची दूरवस्था झाली आहे. ५ कोटी ५० लाख रूपये एवढा मोठा खर्च या रस्त्यावर होणार आहे़ मात्र, अद्याप निम्मे कामही पूर्ण झालेले नाही. शिवाय जे काम केले आहे़, ते निकृष्ट असल्याची ओरड ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर डोंगरदऱ्यातून सुरू असलेली येथील धनगर समाजाच्या लोकांची पायपीट जैसे थे आहे़
महिपतगड येथील मौजे बेलदारवाडीतील ग्रामस्थांनी गेलीे दोन वर्षे आपली कैफियत राजकीय पुढाऱ्यांकडे मांडली आहे़ गतवर्षी रामदास कदम यांचेकडेही ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडली आहे़. यावेळी ठेकेदार काहीही काम करीत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते़ महिपतगड येथील या रस्त्याचे काम गेली १२ वर्षे अपूर्ण आहे़ विशेष म्हणजे या कामाचे भूमिपूजन रामदास कदम यांचे हस्ते झाले आहे़ त्यांनीच या कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याचे स्मरण या ग्रामस्थांनी कदम यांना करून दिले होते़
या रस्त्याच्या पहिल्या दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले आहे़ तिसऱ्या टप्प्याचे कामासाठी रामदास कदम यांनीच निधी मंजूर केला होता़ हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले असून, नियमानुसार बाजूची गटारे बांधली नसल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ठरावामधील २२०० मीटरचे रस्त्याचे काम अद्याप केलेले नाही़ या रस्त्यांमुळे वाडी बेलदार येथील धनगर वस्तीतील १०० ग्रामस्थांना ये-जा करणे आणखी कठीण होऊन बसले आहे.़ शिवाय या ठेकेदाराकडे कामगारांना मजुरी देण्याइतपत पैसे देखील नसल्याचे या ग्रामस्थांनी समोर आणले आहे़ त्यामुळे हे काम अर्धवट स्थितीत राहणार असल्याचे दिसत आहे.
त्यावेळी रामदास कदम यांनीही या ठेकेदाराकडून हे काम काढून त्याला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते़ हे काम अन्य ठेकेदाराला देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मात्र, या ग्रामस्थांच्या मागणीकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे़ याकामी आता पुरातत्व विभागाने पुढाकार घेऊन महिपतगडाच्या एकूणच कामाची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)