शिवसेनेच्या अतिरेकी भूमिकेनेच महायुती तुटली
By Admin | Updated: October 4, 2014 23:56 IST2014-10-04T23:56:15+5:302014-10-04T23:56:15+5:30
राज्यातील आघाडी सरकारने केवळ विकासाची स्वप्नेच

शिवसेनेच्या अतिरेकी भूमिकेनेच महायुती तुटली
नितीन गडकरी : राज्यातील आघाडी सरकारने केवळ विकासाची स्वप्नेच दाखविल्याची टीका
रत्नागिरी : भाजपने शिवसेनेबरोबर २५ वर्षे युती जपली. अनेक अडचणी आल्या तरी भाजपने सामंजस्याची भूमिका घेतली. भांडणे टाळली; मात्र यावेळी १५१ पेक्षा एकही जागा कमी करणार नाही यावर शिवसेना अडून बसली. मुख्यमंत्री सेनेचाच होणार अशी घोषणा करून ज्याचे आमदार अधिक निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री या ठरलेल्या संकेताला हरताळ फासला. शिवसेनेच्या या अतिरेकी भूमिकेमुळेच आम्हाला युती तोडण्यावाचून पर्याय उरला नाही, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.
येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुलात भाजपचे उमेदवार सुरेंद्र तथा बाळ माने यांच्या प्रचारसभेत गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप उमेदवार माने, माधवी माने, भाजपचे राजापूरचे उमेदवार संजय यादवराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, अॅड. बाबा परुळेकर, इब्राहिम खान, गोव्याचे उद्योगमंत्री महादेव नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश शेवडे, जनुभाऊ काळे, जे. पी. जाधव, आदी मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यातील आघाडीच्या सरकारने विकासाची स्वप्ने दाखवीत राज्याचा सत्यानाश केला. राज्याचा विकास काही झाला नाही; मात्र कॉँग्रेस नेते, त्यांचे नातेवाईक, त्यांच्या कार्यकर्त्यांचाच विकास झाल्याचा आरोप गडकरी यांनी केला. राज्यातही घराणेशाहीला ऊत आला आहे. मोदी यांनी सत्तेत येताच खासदाराचा मुलगा खासदार होणार नाही, अशी घोषणा करून घराणेशाहीलाच विरोध दर्शविला आहे. (प्रतिनिधी) (प्रतिनिधी)
रत्नागिरी मतदारसंघातील पक्षबदलूपणाच्या वृत्तीवर गडकरी यांनी कडाडून टीका केली. राष्ट्रवादीने सर्वकाही देऊनही एका रात्रीत पक्षाचे कपडे बदलणाऱ्या पक्षबदलूंना जनता निवडून देणार काय, असे कार्यकर्त्यांनी जनतेला विचारावे, असेही गडकरी म्हणाले.