दरवाढीच्या ‘शॉक’मधून महाराष्ट्र मुक्त
By Admin | Updated: May 27, 2014 01:04 IST2014-05-27T00:40:29+5:302014-05-27T01:04:23+5:30
धोरणामुळे दिलासा : निवडणुका संपताच पाच राज्यांत वीज दरवाढीचा झटका

दरवाढीच्या ‘शॉक’मधून महाराष्ट्र मुक्त
रत्नागिरी : लोकसभा निवडणुका संपताच देशातील पाच राज्यांत वीज दरवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र महाराष्ट्राने दरवाढीबरोबरच ग्राहकांना त्या वाढीएवढेच अनुदानही जाहीर केल्याने राज्यातील ग्राहकांना सुटकेचा दिलासा मिळाला आहे. निवडणुकांमुळे अनेक राज्यांनी दरवाढ थोपवून ठेवली होती. गुजरात, मध्यप्रदेश, ओरिसा व पश्चिम बंगाल या राज्यांनी वीज दरवाढीचे प्रस्ताव सादर केले नव्हते. अन्य राज्यांत अद्याप नवीन वीजदर लागू करण्यात आले नसले तरी गुजरात व महाराष्ट्रात मात्र ते लागू करण्यात आले आहेत. मात्र, महाराष्ट्र सरकारने २० टक्के दरवाढ करताना घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक व कृषी ग्राहकांना दर २० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला. १ एप्रिलपासून नवीन दर जाहीर केले आहेत. मात्र त्यासाठी शासनाकडून अनुदान मिळत आहे. त्यामुळे दरवाढीचा त्रास महाराष्ट्रातील लोकांना सहन करावा लागणार नाही. विभागनिहाय वीज वापराचा विचार केल्यास उत्तर क्षेत्रातील राज्यांसाठी ४१ हजार २२२ मेगावॅट, पश्चिमी राज्यांसाठी ४१ हजार ४५४ मेगावॅट, दक्षिणी राज्यांसाठी ३९ हजार ७९८ मेगावॅट, पूर्व राज्यासाठी १६ हजार ३२७ मेगावॅट, तर उत्तरपूर्व राज्यांसाठी २ हजार १९७ मेगावॅट विजेची मागणी होते. संपूर्ण देशासाठी १ लाख ४० हजार ९९८ मॅगावॅट वीज लागते. पश्चिम बंगालमध्ये २ पैसे, कर्नाटकमध्ये ६६ पैसे, तर आंध्रप्रदेशमध्ये ५० पैसे ते १ रूपये २० पैसेने दर वाढले आहेत. (प्रतिनिधी)