रुग्ण हक्क परिषदेचा २ ऑक्टोबरला महामोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST2021-09-13T04:29:54+5:302021-09-13T04:29:54+5:30
चिपळूण : कोरोना रुग्णांच्या बिलाचे फेरलेखापरीक्षण व्हावे, या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषद येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचे औचित्य ...

रुग्ण हक्क परिषदेचा २ ऑक्टोबरला महामोर्चा
चिपळूण : कोरोना रुग्णांच्या बिलाचे फेरलेखापरीक्षण व्हावे, या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषद येत्या २ ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मुंबई मंत्रालयावर महामोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी जिल्ह्यातील रुग्ण हक्क परिषदेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व बाधित रुग्ण सहभागी होणार आहेत, अशी माहिती परिषदेचे कोकण प्रदेशाध्यक्ष व दहिवलीचे माजी सरपंच सुहास शंकर पांचाळ यांनी दिली.
रुग्ण हक्क परिषदेच्या मोर्चाबाबत रुग्ण हक्क परिषदेचे कोकण प्रदेशाध्यक्ष सुहास पांचाळ यांनी माहिती दिली. याबाबतची महत्त्वपूर्ण बैठक रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे पार पडली. कोरोना रुग्णांच्या बिलाचे फेरलेखापरीक्षण व्हावे आणि अतिरिक्त आकारलेल्या बिलाची रक्कम संबंधित रुग्णांना परत मिळावी. कोरोना रुग्णांच्या बिलाबाबत सोलापुरातील माढा तालुक्यामध्ये रुग्ण हक्क परिषदेने फेरलेखापरीक्षणाची मागणी केली होती. त्यात सुमारे २० लाख ४२ हजार २१४ रुपये एवढी रक्कम अतिरिक्त आढळली. ही रक्कम धनादेशाद्वारे रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून परत करण्यात आली. असा हा माढा पॅटर्न राज्यात सर्वत्र राबविण्यात यावा.
कोरोनामुळे निराधार झालेल्या व्यक्तींच्या बाबतीत शासनाने ठोस धोरण जाहीर करून निराधारांना आधार देण्यासाठीच्या मागणीबाबतचे ठराव या बैठकीत एकमताने घेण्यात आले. या मागण्या घेऊन २ ऑक्टोबर रोजी मुंबई मंत्रालय येथे ‘रुग्ण हक्क परिषदेचा’ महामोर्चा निघणार आहे. या मोर्चात कोरोनाचे नियम पाळून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी तालुक्यासह जिल्ह्यात जनजागृतीपर बैठका घेतल्या जात आहेत. त्यांना रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे या मोर्चात जिल्हाभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच रुग्ण सहभागी होतील, असा विश्वास परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. रुग्णांनी अधिक माहितीसाठी संतोष विठ्ठल घाग, कुमार गौरव वायदंडे, उदय पवार, राजेश सावंत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.