महाबळेश्वर, कोयनेत धुवांधार!

By Admin | Updated: June 22, 2015 00:20 IST2015-06-21T22:50:55+5:302015-06-22T00:20:14+5:30

जिल्ह्यात संततधार : लहानग्यांचा ‘योगदिन’ बुडाला

Mahabaleshwar, koyneet smoke! | महाबळेश्वर, कोयनेत धुवांधार!

महाबळेश्वर, कोयनेत धुवांधार!

सातारा : सातारा शहरासह महाबळेश्वर, पाटण, कोयनानगर, नवजा, तापोळा परिसरात शनिवारी रात्रीपासून रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू आहे. नवजा येथे चोवीस तासांत २७१, तर महाबळेश्वरमध्ये २८०.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सातारा शहरात रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे काही भागातील विद्युतपुरवठा खंडित झाला. शहरात दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे रस्त्यावरून पाणी वाहत होते. राजवाडा, पोवई नाका परिसरात पाणी रस्त्यावर आले होते. रविवारच्या आठवडा बाजारावरही पावसाचा परिणाम झाला. दुपारी रस्ते निर्जन झाले होते.पाटण/ कोयनानगर : कोयना धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसामुळे कोयना धरणात ३१.३१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. शनिवारी धरणात ३०.१९ टीएमसी साठा होता. चोवीस तासांत त्यात १.१२ टीएमसी भर पडली. पाटण तालुक्यातील केरा, कोयना, काफना, काजळी, तारळी, वांग या नद्यांची पाणीपातळी वाढू लागली असून, पहिलाच पाऊस असल्याने अद्याप पूरस्थिती उद््भवलेली नाही, परंतु दिवसरात्र सुरू असलेल्या पावसामुळे घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. योगदिनानिमित्त शाळांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांनाही विद्यार्थी जाऊ शकले नाहीत.
महाबळेश्वर : येथे रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे कोलमडून पडली आहेत. वेण्णा लेकमधील पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी वाढली असून, पाऊस असाच कायम राहिला, तर तलाव पाच दिवसांत भरणार आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी थंडीच्या बचावासाठी कोळशाच्या शेगड्या पेटविल्या आहेत, परंतु शनिवार, रविवार सलग सुट्या असल्यामुळे पावसाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटकांची विशेषत: पुणे, मुंबईकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. पावसाने रुद्रावतार धारण केल्यामुळे पाणी महाबळेश्वर-पुणे रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी, मोही, खटाव तालुक्यातील वडूज, कातरखटाव, औंध, पुसेगाव, पुसेसावळी, मायणी येथे पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. वाई तालुक्यातील भुर्इंज, पाचवडसह फलटण तालुक्यातील विविध भागांत पावसाने दमदार हजेरी लावली. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात पावसाचा जोर कायम आहे.
जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजता झालेल्या चोवीस तासांत पडलेला तालुकानिहाय पाऊस मिलीमिटरमध्ये असा : सातारा २९.९, जावळी ५७.१, कोरेगाव १०.४, कऱ्हाड २०.५, पाटण ७७.९, फलटण २.९, माण १.९, खटाव ५.२, वाई १८.४, महाबळेश्वर ११९.८, खंडाळा ९.४.


प्रतापगडावर दरड कोसळली
किल्ले प्रतापगड येथील वाहनतळाजवळ काही दरड कोसळ्ल्यामुळे काही वेळ या भागातील वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटविल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली.

Web Title: Mahabaleshwar, koyneet smoke!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.