महागावात महाछापा !
By Admin | Updated: July 9, 2015 00:39 IST2015-07-09T00:39:48+5:302015-07-09T00:39:48+5:30
जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : वाहनांसह वाळू उपशाच्या बोटी जप्त

महागावात महाछापा !
सातारा : सातारा तालुक्यातील महागाव येथे कृष्णा नदीकाठी सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा टाकून वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या. या मोठ्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. महागाव येथील कृष्णा नदीतीरावर बुधवारी रात्री अवैध वाळूउपसा सुरू असल्याची माहिती खबऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी अश्विन मुद््गल यांना मिळाली. त्यांनी महसूल उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकासह सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घटनास्थळी धाव घेतली. रात्रीच्या अंधारात महसूल विभागाची वाहने घटनास्थळी येताच वाळू उपसा करणाऱ्यांची पाचावर धारण बसली. वाळू उपसा करणारे सैरावैरा जिकडे जागा मिळेल तिकडे पळायला लागले. अंधाराचा फायदा घेऊन अनेकजण गायबही झाले. नदीत बोटीच्या माध्यमातून वाळू उपसा सुरू होता. दोन मोठे व एक छोटा जेसीबी, दोन पोकलॅन, एक डंपर, एक ट्रक, तीन ट्रॅक्टर, पाच ट्रॉल्या ही वाहने घटनास्थळी उभी होती. अंधाराचा फायदा घेऊन वाळू उपसा सुरू होता. रात्री उशिराने ही कारवाई करण्यात आल्याने येथील वाळू ठेका वैध की अवैध, याची खातरजमा करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. उपसा केलेल्या वाळूची मोजमापे घेण्याचेही काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
गनिमी कावा !
जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी अत्यंत गोपनीयरीत्या ही कारवाई केली. ‘चला, एका ठिकाणी कार्यक्रम करायचा आहे,’ असं म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी गनिमी कावा करत ही कारवाई केली. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही आपण नेमक्या कुठल्या कार्यक्रमाला निघालो आहोत, याची तिळमात्र कल्पनादेखील नव्हती. रात्रीच्या अंधारात कारवाईसाठी निघालेल्या गाड्या क्षेत्रमाहुलीतून महागावच्या दिशेने निघाल्या तेव्हा कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या गनिमी काव्याची जाणीव झाली.
महागाव येथील अवैध वाळू उपशाप्रकरणी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधितांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले जातील. तसेच संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी व तलाठी यांनाही नोटिसा देण्यात येणार आहेत.
- अश्विन मुद््गल, जिल्हाधिकारी