कशेडी घाटात लक्झरी बस कलंडली; १८ जखमी
By Admin | Updated: February 23, 2016 00:34 IST2016-02-23T00:34:19+5:302016-02-23T00:34:19+5:30
एकाची प्रकृती गंभीर : तीव्र उतार वळणावरून वाहने कलंडण्याचे प्रकार सुरूच!

कशेडी घाटात लक्झरी बस कलंडली; १८ जखमी
खेड/मंडणगड : मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात तीव्र उतार वळणावरून वाहने कलंडण्याचे प्रकार अद्याप सुरूच असून, रविवारी दुपारी लक्झरी बस कलंडल्याने झालेल्या अपघातामध्ये बसमधील १८ प्रवासी जखमी झाले. या जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्या नाकातून होणारा रक्तस्त्राव बंद झाल्यानंतरच प्रकृती स्थिर होईल, असे ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रविवारी ठाणे येथून २८ प्रवासी घेऊन खेड येथे निघालेली प्रताप ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (एमएच ४३ एच ७०७०) ही कशेडी घाटात चोळई येथे आली असता घाटरस्त्याच्या प्रारंभीच कलंडली. यावेळी ड्रायव्हर शिवाजी महादेव कराळे (साईनाथनगर, ठाणे) याच्याऐवजी बदली चालक रमेश वसंत घाणेकर हा लक्झरी बस चालवित होता. त्याला घाटाच्या तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने लक्झरीवरील ताबा सुटून लक्झरी बस कलंडली. यावेळी लक्झरबसमधील एकूण २८ प्रवाशांपैकी सुनंदा घाणेकर, सीताराम घाणेकर, रोहन घाणेकर, रघुनाथ शिंंदे, लक्ष्मी निर्मले, मधुकर निर्मले, बदली चालक रमेश घाणेकर, प्रतीक्षा घाणेकर, प्रवीण घाणेकर, सुनिता घाणेकर, दिनेश घाणेकर, सुरेखा बर्जे असे एकूण १८ प्रवासी जखमी झाले. यावेळी बदली चालकाने वाहन चालविण्याचा प्रयत्न केला नसता तर अपघात टळला असता, असे काही जखमी प्रवाशांचे म्हणणे होते.
या अपघाताची खबर मिळताच पोलीस उपनिरीक्षक बी. टी. महाजन व अनिल अंधेरे यांनी अपघातस्थळी हजर होत जखमींना पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये उपचारासाठी रवाना केले आणि रस्त्यावरून कलंडलेली लक्झरी बस बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. याठिकाणी समोरासमोर टक्कर होण्याचे प्रकारही घडतात. यामागे तीव्र वळण कारणीभूत ठरत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)