लोटेत स्फोटसदृश आवाजाने घबराट
By Admin | Updated: July 29, 2016 00:27 IST2016-07-29T00:13:38+5:302016-07-29T00:27:10+5:30
घरडा केमिकल्समधील दुर्घटना : धुराचे लोट उसळल्यामुळे धावपळ

लोटेत स्फोटसदृश आवाजाने घबराट
चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीत घरडा केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी ११.५० वाजता कच्च्या मालाचे फिल्टरेशन प्रोसेस सुरू असताना अचानक दाब वाढला व प्रेशर व्हेंटलाईन खाली कोसळली. त्याचा स्फोटसदृश आवाज झाला आणि त्यातील कच्चा माल बाहेर येऊन धुराचा लोट पसरला. त्यामुळे लोटे परिसरात एकच घबराट उडाली. घरडा केमिकल्समध्ये स्फोट झाल्याची अफवा सोशल मीडियावरून वेगाने पसरली आणि त्यामुळे शासकीय यंत्रणांची मोठी धावपळ उडाली.
मुंबई-गोवा महामार्गावर असलेल्या लोटे औद्योगिक वसाहतीत गुरुवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. प्लॅँट क्रमांक २ मध्ये असलेल्या एका फिल्टरमध्ये कच्च्या मालावर प्रक्रिया सुरू होती. अचानक त्याचा दाब वाढल्यामुळे छताला लटकलेली व्हेंटलाईन खाली कोसळली. यावेळी मोठा आवाज झाला व फिनेलसारखा वास असणारा द्रव पदार्थ बाहेर आला. तो काळ्या रंगाचा असल्याने काळ्या रंगाचे धुराचे लोट हवेत पसरले. १६ सेकंदात हा प्रकार घडला. मात्र, त्यामुळे कंपनीत मोठा स्फोट झाला, अशी अफवा पसरली. महामार्गाकडे धुसर वातावरण तयार झाल्याने वाहतुकीला काही काळ अडथळा निर्माण झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कंपनी व्यवस्थापनाने सायरन वाजविला. तोपर्यंत कंपनीतील अनेक कामगारांना काय घडले हे माहीतही नव्हते.
कंपनीत गेली ८ ते १० वर्षे काहींना काही अपघात घडत असल्याने आजही स्फोट झाला असावा, अशीच चर्चा सुरू झाली. कंपनीने अॅटोसेफ्टी सिस्टीम बसविली आहे. गुरुवारी दाब वाढला त्यावेळी सेफ्टी व्हॉल्व्ह उघडला गेला; परंतु व्हेंटलाईन क्षमतेपेक्षा लहान असल्याने ही दुर्घटना घडली. ही घटना दुर्दैवी आहे. कंपनी व्यवस्थापनाने अद्ययावत यंत्रणा बसवूनही हा अपघात झाला, असे व्यवस्थापक अनिल भोसले यांनी सांगितले.
अपघाताचे वृत्त वाऱ्यासारखे शासकीय यंत्रणेपर्यंत पोहोचले.
त्यानंतर कंपनीचे सहायक संचालक अजित मोहिते तत्काळ घटनास्थळी आले. त्यांनी संपूर्ण यंत्रणा पाहिली. तहसीलदार ए. एस. कदम, पोलिस निरीक्षक अशोक जांभळे, सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. एच. काकडे, हवालदार विवेक साळवी, पोलिस नाईक उमेश भागवत यांनी घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली.
घटना घडली त्यावेळी कामगार उपस्थित होते; परंतु कोणत्याही कामगाराला इजा झालेली नाही. याबाबत आत्ताच निष्कर्ष काढणे योग्य नाही. तपासणी करून योग्य तो अहवाल सादर केला जाईल, असे सहायक संचालक मोहिते यांनी सांगितले. सध्या हा प्लॅँट कुलिंगसाठी ठेवण्यात आला असून याबाबत आज, शुक्रवारी अधिक माहिती घेतली जाईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
कंपनीत कोणताही स्फोट झालेला नाही. येथे अत्याधुनिक सुरक्षा व्यवस्था आहे. दीड ते दोन बार प्रेशरची यंत्रणा येथे आहे; परंतु गुरुवारी प्रक्रिया सुरू असताना अचानक चार ते पाच बारपर्यंत दाब वाढला असावा व व्हेंटमधून मटेरियल बाहेर पडताना हा अपघात घडला. त्यातून जे मटेरियल बाहेर पडले त्याचा काळा धूर तयार झाला. याबाबत योग्य तो तपास केला जात आहे. या अपघातात कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. केवळ कंपनीचा एक व्हेंट खाली पडल्याने तो नादुरुस्त झाला आहे. संपूर्ण चौकशी करून आपण अहवाल सादर करू.
- अजित मोहिते, सहायक संचालक,
घरडा केमिकल्स लि.