‘जलस्वराज्य’मधून मुबलक पाणी

By Admin | Updated: July 25, 2016 00:32 IST2016-07-25T00:32:14+5:302016-07-25T00:32:14+5:30

सत्यनारायण : जागतिक बँकेच्या मदतीने राज्य सरकारकडून टप्पा दोनचे काम

Lots of water from 'Jalswarajya' | ‘जलस्वराज्य’मधून मुबलक पाणी

‘जलस्वराज्य’मधून मुबलक पाणी

चिपळूण : जलस्वराज्य योजनेतून गावातील सर्व ग्रामस्थांना मुबलक पाणी पुरवठा करण्याचे जागतिक बँकेचे ध्येय आहे, त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे मत जागतिक बँकेने जलस्वराज्यासाठी नियुक्त केलेले अभियांत्रिकी तांत्रिक सल्लागार सत्यनारायण यांनी व्यक्त केले.
जागतिक बँकेच्या मदतीने राज्य सरकारकडून जलस्वराज्य टप्पा क्रमांक दोन राबवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील १८ गावांची निवड झाली असून, योजनेचा आराखडा बनवण्याबरोबरच संबंधित स्थापन केलेल्या समित्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. योजनेला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी निवड झालेल्या गावांपैकी चिपळूण तालुक्यातील खेर्डी आणि खेड तालुक्यातील मांडवे या गावांची जागतिक बँकेच्या समितीने पाहणी केली. यावेळी योजनेअंतर्गत जागेची पाहणी करण्यात आली.
दुपारी एकच्या सुमारास खेर्डी ग्रामपंचायतीच्या सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात समितीने ग्रामस्थांशी संवाद साधला. सरपंच जयश्री खताते यांच्या हस्ते सत्यनारायण यांच्यासह समितीमधील सदस्यांचे स्वागत करण्यात आले.
सत्यनारायण म्हणाले की, जलस्वराज्य योजनेतून गावातील सर्व ग्रामस्थांना घरपट नळ कनेक्शन द्यायचे आहे. पाण्यावाचून कोणीही वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. पाणी योजनेत शुध्दीकरण प्रकल्पाचाही समावेश असेल. या योजनेसाठी होणारा सर्व खर्च जागतिक बँक करणार असून, त्यात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. योजनेसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा यामध्ये समावेश केला जाणार असल्याचे स्पष्ट केले. जलस्वराज्यचे उपसंचालक शशांक देशपांडे यांनी योजनेचा उद्देश स्पष्ट केला.
अद्ययावत असलेल्या या योजनेत ग्रामपंचायतीच्या सर्व मागण्यांचा समावेश आहे. २०३२पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करुन ही योजना बनवण्यात येईल. तसेच या योजनेचा सर्व खर्च जागतिक बँक उचलणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर प्रस्तावित योजनेच्या उद्भव विहिरीची पाहणी करण्यात आली.
जिल्ह्यातील सर्व १८ योजनांची मंजुरी अंतिम टप्प्यात असून, आगामी तीन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असेही समितीने सांगितले.
यावेळी पर्यावरणतज्ज्ञ रितू जैन, रामानंद जाधव, सुधारणा सहाय्य व प्रकल्प व्यवस्थापक लोखंडे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एन. व्ही. सावंत, उपअभियंता जंगम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, सरपंच जयश्री खताते, माजी सरपंच दशरथ दाभोळकर, नितीन ठसाळे, सदस्या विकल्पा मिरगल, प्रियांका भुरण, ग्रामविकास अधिकारी ए. के. शिंदे यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
१८ गावांची निवड : घरपट नळ कनेक्शन
४जलस्वराज्य योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८ गावांची निवड़
४समित्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू.
४योजनेला अंतिम मंजुरी देण्यापूर्वी निवड झालेल्या गावांची पाहणी.
४सर्व ग्रामस्थांना घरपट नळ कनेक्शन देणार.

Web Title: Lots of water from 'Jalswarajya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.