वणव्यात काजू बागा जळून लाखोंची हानी
By Admin | Updated: February 13, 2015 00:53 IST2015-02-12T23:52:37+5:302015-02-13T00:53:10+5:30
मुर्तवडे येथील प्रकार : तलाठी नॉटरिचेबल; मात्र कृषी सहाय्यक रिचेबल

वणव्यात काजू बागा जळून लाखोंची हानी
चिपळूण : तालुक्यातील मुर्तवडे गावी मंगळवारी लागलेल्या आगीत काजूच्या बागा भस्मसात झाल्या. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा पंचनामा करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असता तलाठी पाटील ‘नॉटरिचेबल’ होते, तर कृ षी सहाय्यक काळे यांनी तत्परता दाखवून शेतकऱ्यांना दिलासा दिला.
पातेपिलवली गावाकडून मंगळवारी सायंकाळी ६ च्या दरम्याने धुरांच्या लोळासह आगीचा वणवा मुर्तवडे - बौद्धवाडीच्या दिशेने आला. यावेळी अंधार दाटल्याने वणवा विझवणे अडचणीचे झाले. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीत उपसरपंच अशोक राजाराम पवार व त्यांचे भाऊ व शंकर सोनू पवार यांच्या १५ वर्षापुर्वी रोजगार हमी योजनेतून लावलेल्या काजूची लागवड आगीच्या भक्षस्थानी पडल्या . अशोक पवार यांची १०० हून अधिक तर शंकर यांची ७० ते ८० लागती काजूची झाडे जळून खाक झाली. त्या मुळे या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.याबाबत पुढे कोणती कार्यवाही होणार इकडे लक्ष लागले आहे.
वणव्यामुळे अनेक बागाही होरपळल्या असून त्यांचेही नुकसान झाले आहे. वणव्यात भस्मसात झालेल्या बागांचा पंचनामा करण्यासाठी शेतकरी तलाठ्याशी संपर्क साधत होते. मात्र संपर्क होत नव्हता. दोन दिवस तलाठी न भेटल्याने अखेर मंडल अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे भागात लागलेल्या वणव्यात काजू बागांचे मोठे नुकसान झाले असून पंचनामा झाल्यानंतर याबाबतची मदतीची कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
वणवे लावून आंबा, काजूच्या बागांबरोबरच इतरही अनेक वनस्पतींची हानी केली जाते. सागासारखी लागवडही वाया जाते. अनेक औषधी वनस्पती, नैसर्गिक जैवविविधताही नष्ट केली जाते. ही हानी थांबण्यासाठी आता शासन पातळीवरच कठोर निर्णय व्हायला हवा. गावात कटूता नको, वाद नको म्हणून कोणी बोलत नाही. त्यातून सार्वजनिक व राष्ट्रीय संपत्तीचेच नुकसान होत आहे. हे थांबवून, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळायला हवी.
- अशोक पवार, उपसरपंच, ग्रामपंचायत मुर्तवडे