मनमानी चालकांमुळे तोटा
By Admin | Updated: November 10, 2014 23:56 IST2014-11-10T23:10:09+5:302014-11-10T23:56:09+5:30
एस. टी.तील त्रुटी : खेडच्या कारभारावर प्रवासी नाराज

मनमानी चालकांमुळे तोटा
दिनकर चव्हाण -आंबवली -दिवसागणिक तोट्यात सुरू असलेली एस. टी. आता विविध समस्यांनी ग्रासली आहे़ ती नफ्यात आणण्यासाठी आता एस. टी. महामंडळाने नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, एका बाजूला हे प्रयत्न सुरू असताना दुसऱ्या बाजूला एस्. टी. चालकांच्या मनमानीमुळेच अनेक प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे आणि त्याकडे एस्. टी. प्रशासन डोळेझाक करीत आहे. अशातच महामंडळाच्या उदासीनतेमुळे जुन्या योजनांच्या जागी नव्या योजना आणून एस्. टी.ला आणखीनच खाईत लोटण्याचे प्रयत्न तर होत नाही ना, असा संभ्रम निर्माण झाला आहे़
खेड तालुक्यातील बहुतेक मार्गावर धावणाऱ्या एस. टी. बसेस दिलेल्या थांब्यावर थांबत नाहीत. काही वेळा तर एस. टी. रिकामी असली तरीही प्रवासीवर्गाला अनेक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागते. बहुतेक थांब्यांवर एस. टी. थांबत नाही. यापूर्वी ‘हात दाखवा गाडी थांबवा’ अशी एस. टी.ची मोहीम होती. त्याद्वारे प्रवासी संख्या वाढली व अनेक प्रवाशांची सोय झाली होती. मात्र, एखादी योजना यशस्वी झाली की, अचानक बंद करण्यात येते. त्याचा फटका गावोगावी जाणाऱ्या एस. टी.ला बसत आहे. अनेक ठिकाणी हात दाखवूनही गाडी न थांबल्याने प्रवासीवर्गाची गैरसोय होत आहे.
ज्येष्ठ नागरिक एस. टी.च्या अनेक सवलतींचा फायदा घेतात. मात्र, त्यांना अनेकवेळा एस. टी. आवश्यक तेथे थांबविण्यात येत नसल्याने फटका बसत आहे. काही ठिकाणी एस. टी.च्या योजनांची पुन्हा सुरूवात करण्यात येत आहे. मात्र, तोट्यात येत असलेल्या एस. टी.ला अनेक योजना यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मदत घेणे आवश्यक आहे. गेल्या तीन वर्षांत खेड बस स्थानकातील उभ्या असलेल्या एस. टी. बसमध्ये चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत़ पाकिटमार तसेच महिला प्रवाशांची पर्स चोरी आणि गळ्यातील मंगळसुत्राची चोरी होणे, असे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत़ या चोरीच्या प्रकरणातील एकाही आरोपीला आजवर शिक्षा झाली नाही़ मात्र, चालकांच्या मनमानीपणामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. एस. टी.ने परिश्रमपूर्वक त्रुटी दूर कराव्यात, अशी अपेक्षा सर्वसामान्य प्रवासीवर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.