चिनी वस्तंूद्वारे ग्राहकांची लूट
By Admin | Updated: November 15, 2015 23:51 IST2015-11-15T21:34:56+5:302015-11-15T23:51:04+5:30
रत्नागिरी शहर : बिल देण्यास टाळाटाळ; स्वस्ताईचे आमिष दाखवून भरमसाठ किंमती

चिनी वस्तंूद्वारे ग्राहकांची लूट
रत्नागिरी : एकीकडे स्वदेशीचा पुरस्कार करत असताना बाजारात चिनी वस्तूंनी ग्राहकांना भुरळ घातली आहे. मात्र, या वस्तूंच्या किंमती भरमसाठ ठेवल्याने व्यावसायिकांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. याबाबत ग्राहकांनी वस्तूचे बिल मागितल्यास त्यांना ते देण्यात येत नसल्याने ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार रत्नागिरीत घडत आहेत.
भारतीय बाजारपेठ चिनी वस्तूंनी आता गिळंकृत केली आहे. मुक्त व्यापारी धोरणामुळे परकीय राष्ट्रांसाठी भारतीय बाजारपेठ आता कुरण बनली आहे. चिनी बनावटीच्या वस्तूंमुळे कसबी कारागीर बेकार झाले आहेत. हस्त वस्तूंच्या किंमती परवडत नसल्याने त्यांची मागणी रोडावली आहे. मात्र, त्या कारागीरांच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले जात आहे. बाजारात येणाऱ्या वस्तूंवर मेड इन चायना किंवा मेड इन जपान असा शिक्का मारलेलाच असतो. त्यामुळे भारतीय वस्तू आहेत कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. या वस्तू स्वस्त मिळत असल्याने ग्राहक त्यांना अधिक पसंती देत आहे, पण या वस्तूंच्या दर्जाबाबत कोणीच बोलू शकत नाही. दुकानात घेतलेली वस्तू दुकानातून बाहेर पडल्यानंतर नादुरूस्त झाल्यास आपण काहीच करू शकत नाही.
बाजारात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खेळणी, मोबाईल्स, गृहोपयोगी वस्तू चायना मेड असल्याने त्यांच्या किंमती कमी आहेत. मुळातच या वस्तू अत्यल्प किंमतीला दुकानदारांना मिळत आहे. त्यांनी आपल्या दुकानात या वस्तू ठेवल्यानंतर त्यांच्या भरमसाठा किंमती ठेवल्या जात आहेत. रत्नागिरी शहरातदेखील चिनी बनावटीच्या वस्तूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. शहरातील अनेक मोठ्या व्यापाऱ्यांनी या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. यावर आकर्षक गिफ्ट ठेवून ग्राहकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या वस्तू खरेदी केल्यानंतर या वस्तूंचे बिल मागतल्यास दुकानदारांकडून टाळाटाळ केली जात आहे. ‘वस्तू पाहिजे तर घ्या’ असे सांगून ग्राहकांना परत पाठविले जाते. ही वस्तू घेतल्यानंतर त्यात बिघाड झाल्यास काहीच करू शकत नाही. चिनी बनावटीच्या वस्तुंमुळे होणारी लूट थांबविण्यासाठी ग्राहक मंचाने पुढाकार घेण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)
नो गॅरंटी : ग्राहक मंच सुस्तावलेला
ग्राहकांच्या हक्कासाठी ग्राहक मंच कार्यरत आहे. पण, हा मंच केवळ ग्राहकांनी तक्रार दिली तरच त्याची दखल घेत आहे. जोपर्यंत तक्रार नाही तोपर्यंत कारवाई नाही, असा होरा असल्याने ग्राहकांची फसवणूक होऊनही ग्राहक मंच बघ्याची भूमिका घेत आहे. ग्राहक मंचाकडून दुकानांवर धाडी टाकण्याचे प्रकार होत नसल्याने शहरातील दुकानदार निर्ढावलेले आहेत.
‘जागो ग्राहक जागो’चा नारा देत ग्राहकांना जागरूक होण्याचा उपदेश शासक देत आहेत. शासनाच्या या धोरणानुसार अनेक ग्राहक वस्तू खरेदी केल्यानंतर दुकानदाराकडे त्याचे बिल मागत आहे. मात्र, हे बिल देण्यास दुकानदार टाळाटाळ करत असून, या मालाची ‘नो गॅरंटी’ असल्याचे सांगून ग्राहकांच्या तोंडाला पाने पुसत आहेत. विकलेल्या मालाची कोणतीच हमी देण्यास दुकानदार तयार नसतो.
मूळ किंमत कमी
चिनी वस्तू अल्प दरात विकल्या जात असल्याचे भासविले जाते. मुळातच या वस्तूंची किंमत खूपच कमी असते. पण त्या भरमसाठ किमतीने विकतात.