मंडणगडात वडापकडून होतेय प्रवाशांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2016 00:41 IST2016-07-11T00:41:02+5:302016-07-11T00:41:02+5:30

प्रवासीवर्गात संताप : एस. टी.पेक्षा दीडपट भाडे

Loot of passenger traffic from Vadapara | मंडणगडात वडापकडून होतेय प्रवाशांची लूट

मंडणगडात वडापकडून होतेय प्रवाशांची लूट

देव्हारे : मंडणगड तालुक्यामध्ये वडाप वाहतूक करणाऱ्यांकडून प्रवाशांची लूट होत आहे. त्यामुळे प्रवासीवर्गांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. मंडणगड ते बाणकोट मार्गावरील हे वडापवाले बाणकोट ते मंडणगड या प्रवासासाठी पन्नास ते साठ रूपये प्रवाशांकडून घेतात तर देव्हारे ते मंडणगड हे एस. टी.चे अठरा रूपये भाडे आहे. मात्र, वडापवाल्यांकडून हेच भाडे पंचवीस रूपये घेण्यात येते.
एखाद्या प्रवाशाने जादाचे भाडे देण्यास विरोध केला, तर त्याला हे वडापवाले दमदाटी करत असल्याची चर्चा आहे. मंडणगड ते बाणकोट मार्गावर ही अवैध वाहतुक सुरू असून, याकडे एस. टी. महामंडळाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अशाप्रकारे खेड व दापोली मार्गांवरही वडाप सुरू आहे. या दोन्ही मार्गांवरील वडापवाले एस. टी.च्या भाड्याइतकीच रक्कम प्रवाशांकडून घेतात़ मात्र, बाणकोट ते मंडणगड या मार्गावरील वडापवाले मात्र आपण वडाप करून जणू लोकांवर मोठे उपकार करत आसल्याच्या अविर्भावात वावरत आहेत व सामान्य जनतेची लूट करीत आहेत.
एस. टी. पशासनाने अशा वडाप करणाऱ्या गाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थांमधून केली जात आहे. वडापवाले आपल्या गाड्यांमधून, गाडीच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून, नागरिकांच्या जीवाशी खेळतात. या अवैध वाहतुकीकडे पोलीस यंत्रणेचे लक्ष नसते़
त्यामुळे अवैध वाहतूक करणाऱ्या या गाड्यांना अभय कोणाचे आहे? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. यापूर्वीही वडाप करणाऱ्या काही गाड्यांना अपघात होऊन, प्रवाशांना इजा झाली आहे. मात्र, त्यातूनही वडाप करणारे काही शिकलेले नाहीत. मंडणगड ते बाणकोट मार्गावरील वडाप चालकांबाबत प्रवाशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Loot of passenger traffic from Vadapara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.