निवडणुकीतील ‘वाटपा’वर नजर

By Admin | Updated: September 23, 2014 00:18 IST2014-09-22T22:32:01+5:302014-09-23T00:18:40+5:30

प्रशासन सज्ज : सर्वेक्षण पथकाकडून सीसीटीव्हीद्वारे निगराणी

Look at the 'distribution' of the elections | निवडणुकीतील ‘वाटपा’वर नजर

निवडणुकीतील ‘वाटपा’वर नजर

सुभाष कदम - चिपळूण विधानसभा निवडणुकीत जनतेने निर्भयपणे मतदान करावे, कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, यासाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र हजारे यांच्या नेतृत्त्वाखाली मतदारसंघात ३ फिरती पथके व ३ ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथक कार्यरत राहणार आहे. त्यामुळे संभाव्य उमेदवारांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे धाबे दणाणले आहेत.
निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले जाते. पैशांचे आमिष दाखवून मतदारांकडून मतं विकत घेतली जातात. अनेकवेळा मद्याच्या बाटल्या पुरवल्या जातात. मटणाच्या जेवणावळी घातल्या जातात. मतदारांना खूश करण्यासाठी उमेदवार व त्यांचे निकटवर्तीय सातत्याने कार्यरत असतात. आदर्श आचारसंहिता सुरु असताना अशा गोष्टींना दूर ठेवणे क्रमप्राप्त आहे. त्याची अंमलबजावणी होत नाही. यासाठी हळूहळू शासन स्तरावर आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जात आहे.
चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात एक अधिकारी व तीन कर्मचारी यांचे एक फिरते पथक, तर एक अधिकारी, एक पोलीस अधिकारी व तीन पोलीस कर्मचारी असे पथक राहणार आहे. फिरत्या पथकाची जबाबदारी एस. जी. कदम, एम. व्ही. गौंड, एच. डी. जाधव या अधिकाऱ्यांवर राहणार आहे. स्थिर पथके कुंभार्ली, गणेशखिंड व आंबव येथे राहणार आहेत. यामध्ये एस. के. चव्हाण, एस. के. बंगाल, शशी त्रिभुवने, एस. एस. वेतोस्कर, डी. बी. आंबवकर यांचा समावेश राहणार आहे. स्थिर सर्वेक्षण पथक असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. दारुची वाहतूक, पैशांची वाहतूक, हत्यारे किंवा संशयास्पद हालचाली करणाऱ्यांवर निवडणुकीच्या काळात कठोर कारवाई होणार आहे. निवडणूक आयोगाने आचारसंहिता कडक केल्याने सर्वच अधिकारी व कर्मचारी आपल्या कर्तव्याच्या पालनासाठी कठोरपणे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत कोणाचीही भायभिडा ठेवली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. आचारसंहितेचा भंग होईल, असे कृत्य कुणीही करू नये, असे आवाहन केले जात आहे.

आदर्श आचारसंहिता जपण्याचे आवाहन
चिपळूण विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया सुरु असताना कोठेही अनुचित प्रकार घडू नये, आचारसंहितेचा भंग केला जाऊ नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, निवडणुकीच्या काळात घडणाऱ्या प्रकारांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र हजारे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार वृषाली पाटील व वैशाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख व्यवस्था केली आहे.

स्थिर सर्वेक्षण पथक करणार सीसीटीव्हीद्वारे निगराणी.
कुंभार्ली, गणेशखिंड, आंबव येथे केली जाणार तपासणी.
पैसे, मद्य वाटपावर फिरत्या पथकाकडून ठेवणार लक्ष.

Web Title: Look at the 'distribution' of the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.