कुणीतरी टाकेल का नजर रत्नागिरीतील १९० अंधांच्या डोळ्यांवर?

By Admin | Updated: September 16, 2014 23:33 IST2014-09-16T22:02:03+5:302014-09-16T23:33:30+5:30

२०१२-१३मध्ये जिल्ह्यातील ४ व्यक्तिंना नेत्रदानाचा लाभ.

Look at the blind eyes of 190 blind people in Ratnagiri? | कुणीतरी टाकेल का नजर रत्नागिरीतील १९० अंधांच्या डोळ्यांवर?

कुणीतरी टाकेल का नजर रत्नागिरीतील १९० अंधांच्या डोळ्यांवर?

मेहरुन नाकाडे- रत्नागिरी -मानवी शरीर महत्त्वाचे आहे. प्रत्येक अवयव हा तेवढाच अनमोल आहे. ज्यावेळी एखादा अवयव निकामी होतो किंवा तो नसतो, त्याचवेळी त्याचे महत्व कळून चुकते. सृष्टीची किमया पाहण्यासाठी मानवाला ‘डोळे’ लाभले आहेत. मात्र, ज्या व्यक्तिना डोळे नाहीत, त्याबाबत आपण कधी विचार केला आहे का? नेत्रदानामुळे एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सावरू शकते. धकाधकीच्या जीवनात व पारंपरिक विचारसरणी असणाऱ्या मंडळींमुळे कित्येकांना अंधारे आयुष्य जगावे लागत आहे. १६.१३ लाख लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील १९० अंध व्यक्ती दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत.
‘नेत्रदान श्रेष्ठदान’ संकल्पना घेऊन सन २०१२-१३ पासून जिल्ह्यात नेत्रदान मोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी जिल्ह्यातील ४ व्यक्तिंना नेत्रदानाचा लाभ मिळाला होता. २०१३-१४ मध्ये दोन, तर चालू वर्षात आतापर्यंत दोन अंध व्यक्तिंना नेत्रदानाचा लाभ मिळाला आहे. शासनाकडून नेत्रदानाची संकल्पना सर्वसामान्यांच्या मनात बिंबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामान्य नागरिक उत्साहात नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून देतात. परंतु संबंधित व्यक्तीचे निधन झाल्यानंतर मात्र त्याच्या कुटुंबातील सदस्य नेत्रदानासाठी आग्रही नसतात. बहुतेक वेळा विरोध करतात. त्यामुळे संकल्प करणारे हजारो असले तरी नेत्रदान करणारी मंडळी मात्र मोजकीच आहे. याबाबत सामाजिक संघटनांनी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे.
भारताचा विचार केला तर दहा लोक अंध आहे. कोणी नेत्रदान केले तर त्यांचेही आयुष्यात प्रकाश येणार आहे. दरवर्षी देशात एक कोटी लोक मृत्यू पावतात. मृत्यूचे प्रमाण लक्षात घेतले तर दृष्टीची मागणी शिल्लकच राहणार नाही. परंतु तसे होत नसल्यामुळेच हजारो अंध बांधव दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत.
अपघात तसेच अन्य कारणांमुळे तरूण व्यक्ती अंधत्वाच्या शिकार झाल्याचे दिसते. अपघातात किंवा अन्य कारणांमुळे मृत झालेल्या तरूणांच्या कुटुंबांचे समुपदेशन करून त्यांचे डोळे दान केले गेले तर त्यांच्या आयुष्यात नक्कीच प्रकाश येईल. जिल्हा शासकीय रूग्णालयात नेत्रदान समुपदेशन गेली तीन वर्षे सुरू आहे. आतापर्यंत केवळ आठ लोकांनाच याचा लाभ मिळाला असला तरी अद्याप १९० अंध दृष्टीच्या प्रतीक्षेत आहेत.

कसे करावे नेत्रदान ?
मृत्यूनंतर ४ ते ५ तासांच्या कालावधीत मृत व्यक्तीचे डोळे नेत्रतज्ज्ञाकडून नेत्रपेढीत जमा करता येतात.
कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर त्वरित नेत्रपेढीशी संपर्क साधावा.
मृत व्यक्तीची संमती नसल्यासही नातेवाइकांच्या संमतीचे नेत्रदान करता येते.
नेत्रदान केल्याने मृत व्यक्तिचा चेहरा विद्रुप होत नाही.
मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर कापूस व बर्फ ठेवा.
खोलीतील पंखा बंद ठेवा.
नेत्रदान केलेले डोळे कधीच विकले जात नाहीत.

१६.१३ लाख लोकसंख्या असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील १९० अंध व्यक्ती दृष्टीच्या प्रतीक्षेत.
२०१२-१३मध्ये जिल्ह्यातील ४ व्यक्तिंना नेत्रदानाचा लाभ.
आतापर्यंत जिल्ह्यात केवळ आठ लोकांनाच मिळाला लाभ
सामाजिक संघटनांमार्फत नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण होणे गरजेचे.

Web Title: Look at the blind eyes of 190 blind people in Ratnagiri?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.