वनगुळेत झाड कोसळले
By Admin | Updated: July 2, 2016 23:39 IST2016-07-02T23:39:21+5:302016-07-02T23:39:21+5:30
बस बचावली

वनगुळेत झाड कोसळले
लांजा : लांजा कुवे मार्ग वनगुळे अंतर्गत रस्त्यावर काजूचे झाड पडल्याने खासगी आराम बस सुदैवाने या अपघातातून बचावली. मात्र, या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाल्याने विद्यार्थी व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते.
गेल्या आठवड्यापासून कोसळणाऱ्या धुँवाधार पावसामुळे तालुक्यात कोणत्याही प्रकारची वित्तहानी झालेली नाही. मात्र, शुक्रवारी पहिल्या पावसाबरोबर सुटलेल्या जोरदार वाऱ्याने कुवे - वनगुळे मार्गावर कुवे स्टॉपच्यापुढे एक जुनाट काजूचे झाड उन्मळून पडले. यामुळे वनगुळे मार्ग ठप्प झाला होता. झाड पडले त्या ठिकाणी दोन खासगी आराम बस उभ्या करण्यात आल्या होत्या. मात्र, या दोन्ही गाड्या या अपघातातून बालंबाल बचावल्या.
पहाटेला हे काजूचे झाड पडल्याने नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी कुवे येथे जात एकेरी मार्ग दुपारी १ वाजेपर्यंत सुरळीत केला. त्यानंतर सायंकाळी संपूर्ण झाड रस्त्यावरुन हटवून रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यात आला.
कुवे, वनगुळे येथील विद्यार्थी व प्रवासी यांचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल झाले. (प्रतिनिधी)