गुहागर निरामय रूग्णालयाला कुलूप
By Admin | Updated: September 15, 2014 23:28 IST2014-09-15T21:56:04+5:302014-09-15T23:28:54+5:30
इमारतीची सुरक्षा बंद : निधी नाही, सुरक्षारक्षक गायब

गुहागर निरामय रूग्णालयाला कुलूप
गुहागर : एन्रॉन प्रकल्पाबरोबर बंद पडलेली निरामय रुग्णालयाची इमारत देखभाल करण्यासाठी रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाचे सुरक्षारक्षक काम पाहात होते. १५ जुलैपासून रुग्णालय इमारतीची सुरक्षा बंद करण्यात आली आहे.
दाभोळ वीज प्रकल्पग्रस्तांसाठी व येथील जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी १९९९मध्ये सुरु झालेले निरामय रुग्णालय २००१मध्ये बंद पडले. पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी मेडिकल ट्रस्टला हे रुग्णालय चालवण्यासाठी लागणारा खर्च दाभोळ वीज कंपनीकडून दाभोळ वीज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ज्ञानप्रबोधिनी ट्रस्टला देण्यात आला होता. पुढील काळात निधी मिळण्याचे बंद झाले. २२ लाख रुपये थकीत राहिल्याने हे रुग्णालय बंद करण्यात आले.
रुग्णालय पुन्हा सुरु करण्यासाठी एप्रिल २००८ मध्ये मंत्रालय दालनात ऊर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पुणे येथील ज्ञानप्रबोधिनी ट्रस्ट, आरजीपीपीएल व महावितरणचे अधिकारी, दाभोळ वीज कंपनीचे संचालक यांची विशेष बैठक झाली. मात्र, यामधून ठोस तोडगा निघाला नाही. गेली १४ वर्षे निरामय रुग्णालय बंद आहे.
या इमारतीचा ताबा दाभोळ वीज प्रकल्पाकडे आहे. रत्नागिरी गॅस प्रकल्पाकडे प्रत्यक्ष या इमारतीचा ताबा नसूनही बॉम्बे इंटेलिजन सुरक्षारक्षक कांपनीचे सात सुरक्षारक्षक तीन शीफ्टमध्ये सुरक्षा करत होते. त्यांचे पेमेंट रत्नागिरी गॅस प्रकल्पातून होत होते. प्रकल्प अनेक महिने बंद असल्याने १५ जुलैपासून सुरक्षारक्षक सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा बंद करण्यात आल्याने निरामय कायमचेच बंद झाल्यात जमा आहे. (प्रतिनिधी)