कोकण रेल्वे ट्रॅकला भाविकांचा भार
By Admin | Updated: September 16, 2015 00:48 IST2015-09-16T00:47:57+5:302015-09-16T00:48:19+5:30
प्रवाशांची गैरसोय : संथ झालेल्या गाड्यांमुळे भाविकांचे हाल

कोकण रेल्वे ट्रॅकला भाविकांचा भार
चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी मुंबईकरांची संख्या वाढली आहे. मुंबईकरांसाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या. परंतु, या गाड्या गेले दोन दिवस अर्धा ते पाच, सहा तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
अवघ्या कोकणवासीयांचा गणेशोत्सव हा लाडका सण आहे. या काळात असंख्य भाविक मिळेल त्या वाहनाने कोकणात येत असतात. यावर्षी कोकण रेल्वेच्या सर्व गाड्या फुल्ल झाल्या. शिवाय एस. टी. बसेस, खासगी गाड्यांचीही संख्या मोठी आहे. कोकण रेल्वेला गणेशभक्तांची अधिक पसंती असल्याने कोकण रेल्वे महामंडळाने विशेष गाड्या सोडल्या आहेत. सीएसटी - मडगाव गणपती स्पेशल ही गाडी दीड तास उशिरा धावत आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस ४० मिनिटे उशिराने धावत आहे. दादर- सावंतवाडी एक्स्प्रेस २५ मिनिटे उशिरा धावत आहे. गरीबरथ २ तास उशिराने धावत आहे.
मंगला एक्स्प्रेस १ तास ५० मिनिटे उशिरा धावत आहे. मत्स्यगंधा १ तास २० मिनिटे उशिरा धावत आहे. भावनगर कोचिवली २ तास १५ मिनिटे उशिरा धावत आहे. मडगाव - सावंतवाडी पॅसेंजर १ तास २० मिनिटे उशिरा धावत आहे. सावंतवाडी - दादर गणपती स्पेशल २ तास उशिरा, तर मंगलोर - सीएसटी ६ तास उशिरा धावत आहे.
रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्याने चिपळूण रेल्वे स्टेशनवर असलेल्या प्रवाशांचे, लहान मुलांचे हाल झाले आहेत. त्यांना प्यायला पाणी किंवा खायला अन्न मिळणे अवघड झाले होते. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे. (प्रतिनिधी)