थोडीशी काळजी, आवश्यक लसीकरण, योग्य खाणे मुलांना ठेवेल कोरोनापासून दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:24+5:302021-07-01T04:22:24+5:30
रत्नागिरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव हा लहान मुलांवर होईल असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, थोडीशी काळजी, मुलांचे ...

थोडीशी काळजी, आवश्यक लसीकरण, योग्य खाणे मुलांना ठेवेल कोरोनापासून दूर
रत्नागिरी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव हा लहान मुलांवर होईल असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, थोडीशी काळजी, मुलांचे आवश्यक लसीकरण, योग्य आहार याची काळजी पालकांनी घेतली, तर कोरोनाची गंभीर लागण मुलांना होणार नाही, असे रत्नागिरीतील बालरोग तज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
डॉक्टर्स डेच्या निमित्ताने डाॅ. शिंदे यांनी मुलांनी आणि मुलांसाठी पालकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे यावर अगदी सोप्या पद्धतीने माहिती दिली. ते म्हणाले की, मुले ही फायटर असतात. त्यांच्यातील एनर्जी आणि प्रतिकार शक्ती ही मोठ्यांपेक्षा अधिक प्रभावी असते. त्यामुळे कोरोनाची गंभीर लागण होण्याचा धोका मुलांना कमी आहे. तरीही या घटक रोगाचा सामना करण्यासाठी मुलांना तयार करायचे असेल तर त्यांच्या खाण्यापासूनच सुरुवात केली पाहिजे. मुलांनी हाय प्रोटीन डाएट केले पाहिजे. त्यामध्ये मांसाहारी खाणाऱ्या मुलांसाठी फिश, चिकन, अंडी, तर शाकाहारी जेवण जेवणाऱ्या मुलांसाठी पनीर, सोयाबीन, डाली, सुखा मेवा असे खाणे देणे आवश्यक आहे, तर बाहेरचे खाणे, जंक फूड या काळात टाळणे खूपच महत्त्वाचे आहे. त्याशिवाय मुलांनी चांगली झोप घेणे आणि भरपूर पाणी पिणेही आवश्यक आहे.
कोरोनामध्ये येणारा ताप आणि फुप्फुसांना होणारी लागण ही प्रमुख लक्षणे आहेत. त्यामुळे फ्लू आणि निमोनिया यांचे लसीकरण मुलांना करून घेणे आवश्यक आहे. फ्लू आणि कोविड यांची लक्षणे समान आहेत. त्यामुळे फ्लू लसीकरण आवश्यक आहे, तर न्यूमोनिया हा फुप्फुसाशी निगडित आजार असल्याने त्याचेही लसीकरण आवश्यक असून, त्याचप्रमाणे मुलांचे वयानुसार असलेले लसीकरण करणेही आवश्यक आहे. याशिवाय सर्वांप्रमाणेच मुलांनी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर, मास्क वापरणेही आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.
त्यातूनही मुलांना कोरोनाची लागण झाल्यास अशा मुलाचे शरीराचे तापमान सतत पाहणे आवश्यक असते. तर श्वासाचा त्रास, मूल मलूल झाले, धाप लागणे, अंगावर पुरळ उठणे, हीसुद्धा कोविडची लक्षणे असून, असे काहीही जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क करणे आवश्यक आहे. मुलांमध्ये नेहमीच्या कोरोना लक्षणाऐवजी पोटात दुखणे, जुलाब होणे, उलटी होते, ताप येणे, अशी लक्षणे कोरोनामध्ये दिसून आली असून खेळणारे मूल अचानक मलूल होते, त्याला अचानक थकवा आला, चक्कर आली, चालता येत नसेल तर ही कदाचित कोविडची लक्षणे असू शकतात हे पालकांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, असे डॉ. शिंदे म्हणाले.
ज्या मुलांना कोरोना झाला आहे, त्यांची काळजी घेताना, पॉझिटिव्ह लहान मुले घरी असतील तर घरातील को-माॅर्बिटी असलेल्या नातेवाइकांना, ज्येष्ठांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी या लोकांनीच 'रिव्हर्स क्वाॅरंटाईन' होणे आवश्यक आहे, असे सांगताना डॉ. शिंदे म्हणाले की, मुले मास्क बांधून बराच वेळ राहू शकत नाहीत, अलग किंवा विलग होऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा आजारी किंवा ज्येष्ठ नातेवाइकांनीच स्वतःला मुलांपासून वेगळे करणे आवश्यक आहे, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. तर गरोदर महिलांनी, स्तनपान करणाऱ्या महिलांनीही लसीकरण करणे आवश्यक असून, लसीकरण हे सध्याचे कोरोनाविरुद्धचे प्रभावी अस्त्र असल्याचे त्यांनी सांगितले.