लायन्स क्लबतर्फे आज आदर्श शिक्षकांना गौरविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST2021-09-05T04:35:25+5:302021-09-05T04:35:25+5:30
रत्नागिरी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी येथील लायन्स क्लबतर्फे सहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित ...

लायन्स क्लबतर्फे आज आदर्श शिक्षकांना गौरविणार
रत्नागिरी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी येथील लायन्स क्लबतर्फे सहा शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. शहरातील एमआयडीसी भागातील लायन्स आय हॉस्पिटलमधील लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट हॉलमध्ये सकाळी ११.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
लायन्स इंटरनॅशनल संस्था जागतिक स्तरावर सेवाभावी कार्य करणारी संस्था असून, लायन्स क्लब रत्नागिरीमार्फत विविध उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी शहरामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी ‘लायन्स आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन सन्मानित केले जाते. यावर्षी कला, क्रीडा आणि संगीत क्षेत्रामध्ये उत्तुंग कामगिरी केलेल्या शिक्षकांना, तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षक त्यांनाही पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यंदा शिक्षण समिती अध्यक्ष शिल्पा पानवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुरस्कार प्राप्त शिक्षकांची निवड करण्यात आली. यात उदय लिंगायत (क्रीडा, रा.भा. शिर्के प्रशाला रत्नागिरी), शाहनवाज राजापकर (अजिजा दाऊद नाईक हायस्कूल,रत्नागिरी ), अभिषेक भालेकर (संगीत क्षेत्र, पोदार इंटरनॅशनल स्कूल, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. त्यांना लायन ॲड. एच.एल. पटवर्धन पुरस्कृत कै. ल.ग. पटवर्धन स्मृती पुरस्कार स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावर्षी प्रथमच लायन्स क्लब रत्नागिरीमार्फत अन्य काही पुरस्कार देण्यात येणार आहेत. त्यामध्ये बालवाडी शिक्षक विभागामध्ये लायन शिल्पा पानवलकर पुरस्कृत कै. राजश्री दत्तात्रय गडकरी पुरस्कार प्रमोदिनी शेट्ये (बियाणी बालक मंदिर), तर अंगणवाडी सेविका विभागामध्ये वीणा मयूर बलगे यांना देण्यात येणार आहे. कै. अविनाश शिवराम मोरे स्मृतिप्रीत्यर्थ लायन गणेश धुरी यांनी पुरस्कृत केले आहे. पै. हुसेनखान आदमखान फडनाईक स्मृती पुरस्काराकरिता डॉ. सुहास वासावे (सहयोगी प्राध्यापक मत्स्य महाविद्यालय, शिरगाव रत्नागिरी) यांची निवड झाली असून, हा पुरस्कार लायन ॲड. शबाना वस्ता यांनी पुरस्कृत केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते माधव अंकलगे असून, झोन चेअरमन प्रमोद खेडेकर आणि लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष एमजेएफ लायन डॉ. संतोष बेडेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्कार वितरण समारंभाला सर्व लायन्स सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन, लायन्स क्लब रत्नागिरीच्या अध्यक्षा ॲड. शबाना वस्ता यांनी केले आहे.