वेळणेश्वरात वीज कोसळून दोघे जखमी
By Admin | Updated: June 5, 2014 00:46 IST2014-06-05T00:46:11+5:302014-06-05T00:46:26+5:30
एका घराचे व ग्रामपंचायतीचे नुकसान

वेळणेश्वरात वीज कोसळून दोघे जखमी
गुहागर : ढगांच्या गडगडाटासह मंगळवारी पडलेल्या पावसामध्ये पाचेरी आगर येथील एका घराचे व ग्रामपंचायतीचे नुकसान झाले. वेळणेश्वर येथे घरासमोर वीज पडल्याने रुपाली सुधीर शिगवण व मुलगा सर्वेश शिगवण यांच्या पायाला दुखापत झाली आहे. पाचेरी आगर येथील एका घराचे २४ हजार ८७० रुपयांचे नुकसान झाले, तर पाचेरी आगर ग्रामपंचायतीचे ८२५ रुपयांचे नुकसान झाले. वेळणेश्वर येथील रुपाली सुधीर शिगवण या दुपारी १२ वाजता शेतातील काम आवरुन घरी आल्या असता दरवाजासमोर वीज पडली. दारासमोर मोठा खड्डा पडला. यावेळी रुपाली शिगवण यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. हेदवी येथील रुग्णालयात दाखल केले असता शिगवण यांच्या पायाला सात टाके पडले. यावेळी घरामध्ये असलेल्या अन्य दोघांना कोणतीही दुखापत झालेली नसल्याचे तलाठी अहवालात म्हटले आहे. एवढी गंभीर घटना होऊन महसूल खात्याच्या आपत्ती व्यवस्थापनाकडे रात्री १० वाजेपर्यंत कोणतीच नोंद नव्हती. (प्रतिनिधी)