प्रमाणपत्रांसाठी ‘अपंगां’च्या उड्या
By Admin | Updated: May 28, 2014 01:32 IST2014-05-28T01:23:16+5:302014-05-28T01:32:52+5:30
महाराष्ट्र राज्य : अपंग योजनांच्या लाभधारकांमध्ये वाढ

प्रमाणपत्रांसाठी ‘अपंगां’च्या उड्या
प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी अपंगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेकडो लोक पुढे येत आहेत. गेल्या वर्षभरात राज्यातील ३४ जिल्ह्यात १ लाख १४ हजार ८ जणांना पाच प्रकारच्या अपंगत्वाची प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. यातील अपंगत्व प्रमाणपत्र घेणार्यांची सर्वाधिक संख्या १५,६८२ ही पुणे जिल्ह्यात असून, अमरावती दुसर्या, तर जळगाव तिसर्या क्रमांकावर आहे. या दोन्ही जिल्ह्यांत अनुक्रमे ७,२५८ व ६,७५८ जणांना ही प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. पूर्वी अपंगांमध्ये असलेली निरक्षरता आणि उदासिनता आता कमी झाली आहे. अपंग त्यांच्या हक्काबाबत जागरूक झाले आहेत. त्यामुळे आपण अपंग असल्याचे प्रमाणपत्र मिळवणे किती महत्त्वाचे असते, हे त्यांना पटू लागले असून त्यामुळे हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अपंग बांधवांची धडपड मोठ्या प्रमाणात वाढल्याचे गेल्या काही वर्षांत दिसून येते. रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यात निवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या अपंगत्व आलेल्या वृध्दांकडून या प्रमाणपत्रांची मागणी वाढली आहे. पूर्णत: अंध, पूर्णत: कर्णबधीर, पूर्णत: शारीरिक अपंगता, पूर्ण मतिमंद, पूर्ण मानसिक आजार अशा पाच प्रकारांमध्ये ही अपंगत्वाची प्रमाणपत्र त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालय व संबंधित रुग्णालयातून देण्यात आली आहेत. शासनाने अपंग व्यक्तींसाठी विविध कल्याणकारी योजना आखल्या आहेत. काही काळापासून या योजना अस्तित्त्वात आहेत. मात्र, ग्रामीण भागातील लोकांपर्यंत या योजनांची माहिती याआधी पोहोचत नव्हती. गेल्या वर्षभराच्या काळात विविध सामाजिक संस्थांनी याबाबतची माहिती ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे आता जन्मत: व अपघाताने अपंगत्व आलेल्या व्यक्ती अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासकीय रुग्णालयात तपासणी करून घेत आहेत. या प्रमाणपत्रासाठी अर्ज करीत आहेत. राज्य व केंद्रातर्फे अपंगांकरिता विविध कल्याणकारी योजना सध्या राबविल्या जात आहेत. शालांत पूर्व शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, लघुउद्योगांकरिता शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना वित्तीय सहाय, पुनर्वसनासाठी वित्तीय सहाय, शालांत परीक्षेनंतरच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व उद्योगाचे प्रशिक्षण, अपंगांना कृत्रिम अवयव व साधने पुरविणे, व्यावसायिक प्रशिक्षण देणे, स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत करणे. घरघंटी योजना, अपंग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा, वृध्द अपंगांना निवृत्ती वेतन देणे यांसारख्या विविध योजना शासन राबवित आहेत. गेल्या वर्षभरात पूर्ण अंधत्वासाठी सर्वाधिक २५०४ प्रमाणपत्र अमरावती जिल्ह्यातून दिली गेली आहेत. पुणेत २०५४ व वाशिममध्ये १३३९ जणांना प्रमाणपत्र दिली गेल्याने हे जिल्हे दुसर्या व तिसर्या क्रमांकावर आहेत. कर्णबधिरांसाठी पुणेत २५४४, पूर्ण अपंगत्वासाठी नाशिकमध्ये ८८३१, मतिमंदांसाठी यवतमाळध्ये सर्वाधिक १३१, तर पूर्ण मानसिक आजारासाठी मुंबईत २१८३ प्रमाणपत्र देण्यात आली आहेत.