जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान
By Admin | Updated: July 8, 2017 18:03 IST2017-07-08T18:03:46+5:302017-07-08T18:03:46+5:30
समुद्रात भरती सुरू असताना लाटांवर होते तरंगत

जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान
आॅनलाईन लोकमत
असगोली (जि. रत्नागिरी), दि. ८ : गुहागर समुद्रामध्ये जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान देण्यात येथील नागरिकांना यश आले आहे.
मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास समुद्रात भरती सुरू असताना लाटांवर काही तरंगत असल्याचे निरंकार गोयथळे यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता जाळ्यामध्ये कासव अडकल्याचे निदर्शनास आले.
कासव जाळ्यामध्ये अडकलेले पाहिल्यानंतर निरंकार गोयथळे यांनी त्याला पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे कासव जाळ्याच्या गुंतागुंतीत सापडल्याने त्याला बाहेर येणे कठीण होत होते. तसेच समुद्राच्या लाटांबरोबर ते पुन्हा समुद्रामध्ये ओढले जात होते.
अखेर किनाऱ्यावरील सर्वांनी एकत्र येत जाळ्यामध्ये अडकलेल्या कासवाला बाहेर काढण्यात यश मिळविले. कासवाला मोठ्या जखमा झाल्या नव्हत्या. या कासवाला जाळ्यातून मुक्त करून पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.