जीवनदायी योजना त्यांना लाभ कधी

By Admin | Updated: September 18, 2014 23:21 IST2014-09-18T22:07:45+5:302014-09-18T23:21:56+5:30

शिधापत्रिकाधारक : नवीनचा समावेश हवा

Life Benefit Scheme | जीवनदायी योजना त्यांना लाभ कधी

जीवनदायी योजना त्यांना लाभ कधी

चिपळूण : राज्य शासनाने अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वैद्यकीय खर्चात हातभार लाभला असला तरी शासनाने केवळ मार्च २०१३ पूर्वीच्या शिधापत्रिकाधारकांचा या योजनेच्या लाभार्थींमध्ये समावेश केला आहे. त्यानंतर शिधापत्रिका काढलेली लाखो कुटुंब या योजनेच्या लाभापासून वंचित राहिली आहेत. या योजनेच्या लाभार्थींमध्ये मार्च २०१३ नंतरच्या नवीन शिधापत्रिकांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.
राज्य शासनाच्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी व नॅशनल इन्श्युरन्स कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार राज्यभरातील ३५ जिल्ह्यांमध्ये तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात आठ, दुसऱ्या टप्प्यात २७ जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येत आहे. परंतु, शासनाने मार्च २०१३ पूर्वीच्या अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील कुटुंब, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांचा समावेश लाभार्थींमध्ये केल्याने त्यानंतर तयार झालेल्या नवीन शिधापत्रिकाधारक या योजनेच्या लाभापासून वंचित राहात आहेत.
राज्यातील अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेमध्ये शासनातर्फे करण्यात आलेल्या करारानुसार ९७२ प्रकारच्या शस्त्रक्रिया किंवा औषधोपचार व १२१ प्रकारच्या फेरतपासणी उपचारांचा लाभ घेता येत आहे. या योजनेमुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांवर अचानक पडणारा आजारपणातील खर्चाचा बोजा काही प्रमाणात कमी झाला आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ८ जिल्ह्यांतील ४९ लाख ३ हजार १४० कुटुंब, दुसऱ्या टप्प्यात राज्यातील २७ जिल्ह्यांतील एकूण १ कोटी ५८ लाख ९१ हजार १५४ अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकांना लाभ मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील करोडो लोकांच्या वैद्यकीय खर्चाची बचत होणार आहे.
योजना अमलात आल्यापासून त्याअंतर्गत दिली जाणारी हेल्थ कार्ड अद्याप लाभार्थींना देण्याची प्रक्रियाच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेकजण या योजनेच्या लाभापासून वंचित राहात असल्याचे चित्र आहे. शासनाकडे प्रत्येक महिन्याला नवीन अंत्योदय, दारिद्र्यरेषेखालील, केशरी व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारकांची भर पडत असून त्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा, अशी मागणी जनतेतून होत आहे. आता या योजनेतील लाभार्थींपर्यंत पोहोचण्यासाठीचा मार्ग बिकट होत आहे. (वार्ताहर)

लाभार्थींपर्यंत पोहोचण्यास उशीर
शासनाच्या अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी आजारात सहाय्य मिळण्याचा उद्देश
समाजातल्या विविध दुर्बल घटकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न.
शिधापत्रिकाधारकांना लाभ
वैद्यकीय खर्चाची बचत.

या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील जनतेला मिळावा, हा प्रमुख हेतू आहे. खासगी वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महागडी होत आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला आरोग्य सुविधा मिळाव्यात, हा हेतू मनात ठेवून पुढे आलेली ही योजना शिधापत्रिकांच्या समस्यांमुळे कठीण बनली आहे.

Web Title: Life Benefit Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.