टप्प्याटप्प्याने आवाज बंद करू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:30 IST2021-08-29T04:30:18+5:302021-08-29T04:30:18+5:30
लांजा : निवडणुका आल्या की शिवसैनिक लागतात. मातोश्रीवर ...

टप्प्याटप्प्याने आवाज बंद करू
लांजा : निवडणुका आल्या की शिवसैनिक लागतात. मातोश्रीवर बसून सगळी कामे केली जातात. मंत्रालयातील दालनात ते जातही नाहीत. आज जास्त बोलत नाही. पुढच्यावेळी येऊ, त्यावेळी अधिकचे बोलू आणि टप्प्याटप्प्याने आवाज बंद करू. माझा आवाज कोणीच बंद करू शकत नाही. खोटेपणा कराल तर हीच जनता तुम्हाला उत्तर देणार आहे. पुढे या कोकणातून शिवसेनेचा एकही आमदार, खासदार निवडून जाणार नाही, असा आपण निर्धार करुया आणि शिवसेना हद्दपार करुया. आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सूड उगवूया, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लांजा येथे केले.
शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री राणे यांची जनआशीर्वाद यात्रा शेट्ये पटांगणात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी या यात्रेचे स्वागत केले. तालुक्यातील अनेक संस्थांनीही मंत्री राणे यांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री, आमदार आशिष शेलार, आमदार नीतेश राणे, माजी खासदार डॉ. नीलेश राणे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार कालिदास कोळंबकर, जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुकाध्यक्ष महेश तथा मुन्ना खामकर, राजश्री विश्वासराव, जिल्हा सरचिटणीस यशवंत वाकडे, तालुका प्रभारी वसंत घडशी, भाई जाधव, प्रसन्न शेट्ये उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्री राणे पुढे म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. घरात घुसून बलात्कार होत आहेत. दुकानात घुसून दरोडा टाकला जात आहे. राज्यामध्ये महिला, दुकानदार, शेतकरी, कलाकार, सर्वसामान्य माणूस सुरक्षित नाही राहिला आहे. मुख्यमंत्री मातोश्री सोडून बाहेर पडत नाहीत. मंत्रालयाच्या दालनात जात नाहीत. ते सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवणार? ते शिवसैनिकांना भेटायला आले का? त्यांनी एकट्याने शिवसेना वाढवली का? निवडणुका आल्या की शिवसैनिक लागतात, अशी अवस्था आहे. यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत व खासदार संजय राऊत यांनाही लक्ष्य केले.
आपल्याकडे असलेल्या सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री पदाचा कोकणात जास्तीत-जास्त उपयोग करणार आहे. तिन्ही जिल्ह्यात उद्योजक तयार झाले पाहिजे. छोटे - छोटे उद्योग तयार झाले की, कोकणात आर्थिक सुबत्ता येईल. त्यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. महिला बचत गट व युवकांनी पुढे येऊन त्यांना मिळणाऱ्या संधीचा फायदा घ्यावा, असेही आवाहन मंत्री राणे यांनी केले. आमदार आशिष शेलार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांवर कडाडून टीका केली.