नारळ टोळीला कायद्याच्या बडग्याने वठणीवर आणूया : मारुती खेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:32 IST2021-09-03T04:32:25+5:302021-09-03T04:32:25+5:30
राजापूर : नारळ ठेवून शपथा घ्यायला लावणारी मंडळी कोण हे राजापूर तालुक्यातील ग्रामस्थांना चांगलेच ठावूक आहे. जोवर या नारळ ...

नारळ टोळीला कायद्याच्या बडग्याने वठणीवर आणूया : मारुती खेडकर
राजापूर : नारळ ठेवून शपथा घ्यायला लावणारी मंडळी कोण हे राजापूर तालुक्यातील ग्रामस्थांना चांगलेच ठावूक आहे. जोवर या नारळ टोळीवर कारवाईचा बडगा दाखवून वठणीवर आणण्यासाठी प्रयत्न केले जात नाहीत तोपर्यंत भावी पिढीचे भवितव्य दोलायमानच राहणार असल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे मुंबईतील माजी नगरसेवक व ओणीतील रहिवासी मारुती खेडकर यांनी केली आहे.
तालुक्यातील समाजसेवक, समाजसेवी संघटना, ग्रामपंचायती या सर्वांनी आपले उग्ररूप दाखविण्यास सुरूवात केली तर या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना पळताभुई थोडी होईल. प्रकल्प समर्थक लोकशाही मार्गाने आपला लढा लढत आहेत तर प्रकल्पविरोधक गावकाराला हाताशी धरून स्थानिक ग्रामस्थांना नारळावर हात ठेवून शपथ घेण्यास लावत आहेत. असे करणारे गावकार विघ्नसंतोषी असून, एकविसाव्या शतकात सुज्ञ बनलेल्या तरूण व गावकऱ्यांनीच याला यापुढे विरोध केला पाहिजे. तुमच्या पाठीशी रिफायनरी प्रकल्प समन्वय समिती आहे, असे खेडकर यांनी म्हटले आहे.
रिफायनरी प्रकल्प हा आपल्या भावी पिढीचे भवितव्य ठरविणारा प्रकल्प आहे हे विसरून चालणार नाही. हा लढा एकट्याचा नाही. संपूर्ण तालुकावासीयांचा आहे. एमआयडीसीसाठी आधीच २,३०० एकरची अधिसूचना निघालेली आहे तर रिफायनरीसाठी लागणारी अतिरिक्त जमीन स्थानिक जमीनदार देण्यास तयार आहेत. आपण संघटीतरित्या विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले पाहिजे. प्रकल्प समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांच्या खांद्याला खांदा लावून आपली एकजूट अखंड ठेवावी. प्रकल्प आपला आहे व आपलाच राहील अशीही गर्जना खेडकर यांनी केली आहे.