कोकणात शेतीकडे तरुणांची पाठ...!

By Admin | Updated: July 29, 2014 22:59 IST2014-07-29T22:15:10+5:302014-07-29T22:59:13+5:30

पारंपरिक पध्दतीने शेती : वर्षभर पुरेल इतके धान्य पिकत नसल्याने शेतीकडे दुर्लक्ष

Lessons of farming in Konkan farming ...! | कोकणात शेतीकडे तरुणांची पाठ...!

कोकणात शेतीकडे तरुणांची पाठ...!

सुरेश पवार -दस्तुरी , कोकणात प्रामुख्याने भातशेती केली जाते. येथील बहुतांश लोकांची उपजीविका शेतीवरच अवलंबून असते. ही शेती पारंपरिक पध्दतीने आजही पावसाच्या पाण्यावरच घेतली जाते. वर्षाकाठी केवळ भाताचेच पीक घेतले जाते. काही ठिकाणीच तूर, उडीद, वरी अशी पिके घेतली जातात. मुळात जमीन कातळाची असल्याने अन्य पिके घेण्यासाठी येथे कमी वाव आहे.
पूर्वी भातशेती मोठ्या प्रमाणावर केली जायची. मात्र, प्रचंड मेहनत व कमी उत्पन्न यामुळे भातशेतीचे प्रमाण कमी होत चालले आहे. प्रथम कवळ तोडणे, जमीन भाजणे, पेरणी करणे नंतर लावणी, बेणणी करणे, कापणी करणे आणि मळणी करणे. एवढी प्रक्रिया पार पाडून हाती काही क्विंटल तांदूळ पडतो. आपल्या शेतीतून पिकणाऱ्या भातावर संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे कठीण होते. त्यामुळे मुंबई किंवा पुणे अशा ठिकाणी नोकरी करणे भाग पडते. पूर्वीप्रमाणे आता पाऊसदेखील वेळेवर व पुरेसा पडत नाही. त्याचबरोबर मजूर मिळणेही अवघड झाले आहे. पूर्वी एकत्र शेती व्हायची. आता ती पद्धत मोडत चालली आहे. शिवाय पावसाळा सोडला तर बैलांना वर्षभर खाण्यासाठी चाराही कमीच असतो. काही दिवसांच्या कामासाठी वर्षभर बैलांना सांभाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्याचबरोबर बैलांच्या किमतीही प्रचंड वाढल्या असल्याने आता बैलजोडीही मिळणे दुरापास्त झाले आहे. शेतीसाठी बैलही नाहीत तसेच शेतीच्या कामासाठी माणसेही मिळत नाहीत. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकरीवर्गाला भेडसावत आहे. त्यामुळे भावी पिढी शेतीकडे वळण्यापेक्षा उद्योगधंदे, नोकरीकडे वळत आहे. सध्या शेतीपेक्षा रोजगाराचे अन्य मार्ग सोयीचे वाटत असल्याने तरुणवर्ग शेती करण्यास फारसा इच्छुक नाही. त्यामुळे पुढील काही वर्षात कोकणातील पारंपरिक भातशेती टिकेल की नाही, याबाबत खात्री देता येत नाही.
कोकणात भातशेती हा मुख्य पर्याय शेतकऱ्यांपुढे असल्याने यावर येथील शेतकऱ्यांची उलाढाल अवलंबून असते. आता भातशेतीही महागडी व न परवडणारी झाल्याने त्यात पारंपरिकतेचा वापर अधिक होऊ लागला आहे. या विषयात शासनाच्या विविध भागानी लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत शेतकरी व्यक्त करीत आहेत. कोकणात शेती करणे हा वेगळा पर्याय आहे. शेतीला फळबागायतीचा उत्तम उपाय समोर असला तरी भातशेतीतून आर्थिक मेळ बसत नसल्याने नवा पर्याय तरूण स्वीकारतील की नाही, हा मोठा प्रश्न आहे.तरूणाई भातशेतीकडे वळत नसल्याने तरूणांना पुन्हा या क्षेत्राकडे वळविण्यासाठी प्रयत्न सुरू करणे, यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

Web Title: Lessons of farming in Konkan farming ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.