अस्वच्छ उद्यानांकडे मुलांची पाठ
By Admin | Updated: November 5, 2014 23:35 IST2014-11-05T22:47:05+5:302014-11-05T23:35:50+5:30
नगर परिषद : दोन उद्यानांची देखभाल करण्यासही वेळ नाही ?

अस्वच्छ उद्यानांकडे मुलांची पाठ
सुमय्या तांबे - खाडीपट्टा -शहरात असणाऱ्या सिमेंटच्या जंगलातून काही काळ विरंगुळा मिळावा, मोकळा श्वास घेता यावा, याकरिता लहान मुलांना खेळण्यासाठी बागडण्यासाठी व्यापक जागा असावी, आबालवृद्धांना, जेष्ठ नागरिकांना निवांत बसता यावे, यासाठी खेडमध्ये उद्यानांची निर्मिती करण्यात आली. परंतु, अस्वच्छता व बकालीकरणामुळे या उद्यानाकडे चिमुकल्यांनी सध्या पाठ फिरविली आहे.
खेड नगर परिषदेच्या हद्दीत जिजामाता उद्यान व प्रबोधनकार ठाकरे उद्यान अशी दोन उद्याने आहेत. शिवसेनेच्या राजवटीत शिवसेना नेते, आमदार रामदास कदम व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून या उद्यानांचे सुशोभिकरण करण्यात आले. नागरिकांना शहरात काही क्षण आनंदाने वेचता यावेत, त्यांची करमणूक व्हावी व विरंगुळा मिळावा, ही त्यामागची संकल्पना होती. गेली काही वर्षे हे उद्यान सुस्थितीत होते. परंतु, सध्या या उद्यानाकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रबोधनकार ठाकरे उद्यानातील गवत काढून त्याची साफसफाई काहीअंशी सुरु आहे. विशेषकरुन नगर परिषदेच्या शेजारी असलेल्या जिजामाता उद्यानाची अवस्था बिकट आहे. जिजामाता उद्यानालगत खांबतळे आहे. दोन वर्षांपूर्वी या तळ्यातील वाढलेल्या वेली, झाडेझुडपे तोडून त्याचे सुशोभिकरण करण्यात आले होते. त्यामुळे येथे गुदमरलेल्या माशांना व जलचरांना दिलासा मिळाला होता. येथे लहान मुले, आबालवृद्ध या उद्यानांचा मनमुराद आनंद लुटत होते. परंतु, आज या उद्यानाची स्थिती अतिशय दयनीय आहे. उद्यानाच्या अवतीभोवतीचा परिसर बकाल झाला आहे. उद्यानात गवत वाढले आहे. तळ्यात पुन्हा झाडाझुडपांची गर्दी झाली आहे. उद्यानाच्या अवतीभोवतीचा कठडा, लोखंडी गेटही निकामी झाला आहे. एकूणच या उद्यानाची दुर्दशा झाली आहे. नगर परिषद प्रशासनाने या उद्यानाची दुरुस्ती केल्यास शहरातील नागरिकांना पुन्हा एकदा लाभ घेता येईल. उद्यानाची देखभाल दुरुस्ती वेळच्यावेळी करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. या उद्यानालगत असलेल्या तलावाकडील कठडा तुटल्याने लहान मुले खेळताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खेडच्या वैभवात भर टाकणाऱ्या या उद्यानाची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
1उद्यानात असलेल्या पालापाचोळ्यात लहान मुले खेळत असतात. सरपटणाऱ्या प्राण्यांमुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. उद्यानातील खेळण्यांचीही मोडतोड झाली आहे. ही खेळणी नव्याने बसवण्यात यावी किंवा त्यांची दुरुस्ती करावी, अशी पालकांची मागणी आहे. उद्यानाची साफसफाई झाली तर अबालवृद्धांनाही याचा लाभ होईल.
2शिवसेनेच्या काळात शहरातील विकासासह नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊन उभारलेले हे उद्यान नगर परिषदेतील सत्ता बदलानंतर मात्र, अखेरच्या घटका मोजत आहे. नगर परिषदेतील सत्ताधाऱ्यांबरोबरच पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने उद्यानाची अवस्था दयनीय झाली आहे.
3उद्यानात असलेल्या पालापाचोळ्यात लहान मुले खेळत असतात. त्यामुळे येथे सरपटणाऱ्या प्राण्यांचा मोठा धोका आहे. याकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे. सध्या वाढलेल्या गवतामुळे लहान मुलांनी या उद्यानांकडे पाठ फिरवली आहे.