रत्नागिरीत लेप्टोचे आणखी सात रुग्ण
By Admin | Updated: July 21, 2016 00:52 IST2016-07-20T23:43:39+5:302016-07-21T00:52:07+5:30
उपचार सुरू असलेल्या लेप्टोच्या रुग्णांची संख्या १७ झाली

रत्नागिरीत लेप्टोचे आणखी सात रुग्ण
रत्नागिरी : जिल्ह्यात लेप्टोची लागण वाढतच चाललीआहे. बुधवारी आणखी सातजणांना लेप्टोची बाधा झाली असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या लेप्टोच्या रुग्णांची संख्या १७ झाली आहे़ यंदा पावसाळा सुरू झाल्याापासून लेप्टोचे ९५ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.
लेप्टोस्पॉयरोसिस बाधित प्राणी उंदीर, डुक्कर, गायी व कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीचे दूषित पाणी माती, भाज्या याद्वारे माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास त्याची बाधा होते. आरोग्य विभागाकडून लेप्टोबाबत घ्यावयाची काळ जी यावर जोरदार प्रचार, प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात लेप्टोचे आतापर्यंत एकूण ९५ संशयित रुग्ण आढळले होते. त्या सर्व रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, रक्त तपासणीनंतर त्यातील १० जण लेप्टोबाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. आता त्यामध्ये आणखी ७ रुग्णांची भर पडली आहे. रत्नागिरी तालुक्यातील अनंत पांडुरंग भाटकर (७८, भाट्ये), सुनील जयराम मोहिते (४३, मिरजोळे), सुहास दामू धनावडे (४४, गडनरळ), चिपळूण तालुक्यातील चिन्मय सुरेश प्रभू (१९, कापसाळ), संगमेश्वर तालुक्यातील सुनील रघुनाथ जाधव (४५, कोंडअसुर्डे), महादेव धोंडू बेंद्रे (४९, मोर्डेे) आणि लांजा तालुक्यातील मनोहर महादेव पांचाळ (६०, कोचरी) हे रुग्ण सापडले असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत.
शेतामध्ये काम करणारे लोक तसेच प्राण्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती यांनी त्यांना जखम झालेली असल्यास त्वरीत ड्रेसिंग करुन घ्यावे़ शक्यतो उघड्या पायाने पाण्यामध्ये जाणे टाळावे़ पायामध्ये गमबुट घालावेत़ उंदीर व घुशी यांचा नायनाट करण्यात यावा़ तसेच लेप्टोची लक्षणे रुग्णामध्ये आढळून आल्यास त्वरीत नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन उपचार करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (शहर वार्ताहर)