आणखी ५ जणांना लेप्टो

By Admin | Updated: August 13, 2014 23:32 IST2014-08-13T22:14:53+5:302014-08-13T23:32:29+5:30

साथ फैलावली : जिल्ह्यात लेप्टोचे एकूण १५ रुग्ण

Leppto for 5 more | आणखी ५ जणांना लेप्टो

आणखी ५ जणांना लेप्टो

रत्नागिरी : जिल्ह्यात लेप्टोचे आणखी पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने रुग्णांच्या ७१६ सहवासितांवर तत्काळ प्रतिबंधात्मक उपचार केले असून, आणखी सहवासीतांवर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या तोंडावरच या रोगाने आपले पाय पसरले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी साथग्रस्त भागात तळ ठोकून आहेत. रोगबाधित प्राणी उंदीर, डुक्कर, गाई, म्हशी व कुत्री यांच्या लघवीवाटे जंतू बाहेर पडतात. या प्राण्यांच्या लघवीचे दूषित पाणी, माती, भाज्या यांचा माणसांच्या त्वचेशी संपर्क आल्यास हा रोग होतो. आरोग्य विभागाकडून लेप्टोबाबत घ्यावयाची काळजी यावर जोरदार प्रचार, प्रसार मोहीम राबविण्यात येत आहे.
एप्रिलपासून जिल्ह्यात लेप्टोचे मंगळवारपर्यंत एकूण १० रुग्ण होते. त्या सर्व रुग्णांवर औषधोपचार केल्यानंतर बरे झाले आहेत. त्यामध्ये आणखी ५ रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरी शहरातील लगतच्या उद्यमनगर येथील बरकत हाजी शेख (३५) हा रुग्ण सापडला असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत. तसेच नंदकुमार विष्णू सुतार (४५, कोसुंब, संगमेश्वर), बाळू पांडू सोलकर (७०, मलदे, संगमेश्वर), साखरी सांजू झोरे (७०, घेराप्रचितगड, संगमेश्वर) व सादीक युसूफ पाटणकर (४५, लांजा), हे रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार करण्यात आले असून, त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली आहे.
रुग्णांना लेप्टो झाल्याचे स्पष्ट होताच आरोग्य विभागाकडून रुग्णांच्या सहवासात आलेल्या ९०० लोकांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले होते. त्यानंतर या पाच रुग्णांच्या ७१६ सहावासितांवर प्रतिबंधात्मक उपचार करण्यात आले. आरोग्य विभागाकडून या पाच रुग्णांच्या गावांमध्ये लेप्टोबाबतचे सर्वेक्षण सुरु केले आहे. तसेच लेप्टोबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन आरोग्य विभागाने नागरिकांना केले आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: Leppto for 5 more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.