कळंबस्तेतील पडक्या विहिरीत मृतावस्थेत सापडला बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:30 IST2021-04-13T04:30:52+5:302021-04-13T04:30:52+5:30

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील एका ग्रामस्थांच्या मालकीच्या पडक्या विहिरीत मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत सोमवारी सापडला आहे. ...

A leopard was found dead in a fallen well in Kalambast | कळंबस्तेतील पडक्या विहिरीत मृतावस्थेत सापडला बिबट्या

कळंबस्तेतील पडक्या विहिरीत मृतावस्थेत सापडला बिबट्या

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील एका ग्रामस्थांच्या मालकीच्या पडक्या विहिरीत मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत सोमवारी सापडला आहे. भक्ष्याचा पाठलाग करताना हा बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे. वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या मृत बिबट्याला बाहेर काढून पंचनामा केल्यानंतर अग्नी देण्यात आला.

तालुक्यातील कळंबस्ते तेलेवाडी येथील परिसरात गेले दोन दिवस कुजकट वास येत होता. सोमवारी सकाळी हा कुजकट वास तीव्र स्वरूपात येऊ लागल्याने सीताराम नेवरेकर यांनी आपल्या पडक्या विहिरीत डोकावून पाहिले असता, आत बिबट्या असल्याचे लक्षात आले. नेवरेकर यांनी तत्काळ ही बाब येथील सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य राजू पाटील यांना सांगितली. ही माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. हा बिबट्या भक्ष्याचा पाठलाग करत असता विहिरीत पडला असावा आणि विहीर खोल असल्याने त्याला वर येता आले नसल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला.

वनविभागाच्या परिक्षेत्र वनाधिकारी प्रियांका लगड, वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक एम.एच. गावडे, आकाश कडुकर, राहुल गुंठे, मिलिंद डाफळे, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान विचारे आदी उपस्थित होते. पंचनामा करून तेथील परिसरात बिबट्याला अग्नी देण्यात आला. हा बिबट्या मादी जातीचा असून ३ वर्षे वयाचा असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. नेवरेकर यांच्या विहिरीत बिबट्या पडला असल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी यावेळी गर्दी केली होती.

Web Title: A leopard was found dead in a fallen well in Kalambast