महाळुंगेत बिबट्या पडला विहिरीत
By Admin | Updated: March 25, 2015 00:44 IST2015-03-24T21:40:17+5:302015-03-25T00:44:33+5:30
दरम्यान गेल्या १५ दिवसातच याच परिसरात तीन बिबट्या सापडल्याने बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याचे दिसून येत आहे

महाळुंगेत बिबट्या पडला विहिरीत
राजापूर : विहिरीत बिबट्या पडण्याची आणखी एक घटना तालुक्यातील महाळुंगे बौद्धवाडीत घडली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी विहिरीत पिंजरा सोडून त्याला सुखरुप बाहेर काढले. मागील १५ दिवसांत बिबट्या विहिरीत पडल्याची दुसरी तर फासकीत अडकून जिवंत सापडल्याची एक अशा तीन घटना घडल्या.तालुक्यातील महाळुंगे बौद्धवाडीतील नितीन विश्राम पवार यांच्या विहिरीत हा बिबट्या सापडला. तो मादी जातीचा असून साधारणत: अडीच ते तीन वर्षांचा असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. सकाळी १०च्या दरम्यान पंपाद्वारे पाणी का येत नाही, हे पाहण्यासाठी स्वत: नितीन पवार गेले. त्यावेळी विहिरीत बिबट्या डरकाळ्या फोडताना आढळला. त्याने विहिरीतील पाईप तोडून टाकला होता तर आतील पाणी खराब केले होते.याबाबत राजापूरच्या वनविभागाला याबाबतची खबर देण्यात येताच वनविभागाचे वनरक्षक गोसावी, कर्मचारी विजय म्हादये, कृष्णा म्हादये, दामोदर गुरव यासहीत अन्य मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विहिरीत पिंजरा सोडून आत त्याला बंदिस्त करण्यात आले आणि सुखरूप वर आणण्यात आले. विहिरीत पडलेल्या या बिबट्याची लांबी १७५ सेंटीमीटर तर उंची ७२ सेंटीमीटर एवढी आहे, अशीही माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.ही विहीर ४५ फूट खोल असून, आत ४ फुटाएवढे पाणी होते. त्यामुळे जखम झाली नाही. दरम्यान वन विभागाचे जिल्हा वनक्षेत्रपाल अशोक लाड, वनरक्षक सागर गोसावी, लांजाचे वनपाल ल. वी. गुरव, वनरक्षक उमेश आखाडे, पाटील, पांडव आदी यावेळी उपस्थित होते. नंतर त्या बिबट्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.दरम्यान गेल्या १५ दिवसातच याच परिसरात तीन बिबट्या सापडल्याने बिबट्यांचा मानवी वस्तीत वावर वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व ग्रामीण परिसरातील लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. (प्रतिनिधी)
गेल्या १५ दिवसातील राजापूर तालुक्यातील तिसरी घटना.
पंपाव्दारे पाणी येत नसल्याने विहिरीत पाहिले असता आढळला बिबट्या.
राजापूर तालुक्यात बिबट्यांचा मानवी वस्तीतील वावर वाढला.
मादी जातीच्या बिबट्याला सोडले नैसर्गिक अधिवासात.