तोंडलीगावच्या सीमेवर मध्यरात्री बिबट्याचा थरार; झटापटीत एकजण गंभीर जखमी, बिबट्याचा मृत्यू

By संदीप बांद्रे | Updated: March 16, 2025 19:11 IST2025-03-16T19:11:33+5:302025-03-16T19:11:50+5:30

बिबट्याने महाजन यांचे पाय, हात, छाती आणि चेहऱ्यावर देखील जबरदस्त असे प्रहार केल्याने आशिष महाजन गंभीर जखमी झाले.

Leopard attack on the border of Tondaligaon in Chiplun | तोंडलीगावच्या सीमेवर मध्यरात्री बिबट्याचा थरार; झटापटीत एकजण गंभीर जखमी, बिबट्याचा मृत्यू

तोंडलीगावच्या सीमेवर मध्यरात्री बिबट्याचा थरार; झटापटीत एकजण गंभीर जखमी, बिबट्याचा मृत्यू

चिपळूण : तालुक्यातील तोंडली वारेली गावच्या सीमेवर असलेल्या घरावर शनिवारी मध्यरात्री बिबट्याने जोरदार हल्ला चढवला आणि घरमालक व बिबट्यामध्ये जोरदार झटापट झाली. बिबट्या हल्ल्यात स्वतःच्या संरक्षणासाठी घरमालक आशिष महाजन देखील बिबट्याचा प्रत्येक हल्ला परतवण्यासाठी तब्बल दोन तास लढत होते. बिबट्या व त्यांच्यामध्ये जणू तुंबळ हाणामारीच सुरू होती. अखेर बिबट्याने आशिष शरद महाजन यांना गंभीर जखमी केले. अशाही अवस्थेत ते लढा देत राहिले. अखेर बिबट्याने देखील हात टेकले. झटातपटीत बिबट्या गंभीर जखमी झाला आणि काही वेळेतच त्याने प्राण सोडले. जखमी आशिष महाजन यांना तात्काळ डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

तालुक्यातील तोंडली, पिळवली, वारेली या दुर्गम भागात बिबट्याचा सलग वावर असल्याचे यापूर्वी अनेकवेळा समोर आले आहे. वर्षभरापूर्वी अशाच प्रकारे घरात घुसून बिबट्याने एका महिलेवर जोरदार हल्ला चढवला होता. घराच्या माळ्यावर संपूर्ण रात्र बिबट्या दबा धरून बसला होता. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी दुपारी बिबट्याला त्या घरातून बाहेर काढले होते. त्यामध्ये घरातील महिला जखमी झाली होती. त्यामुळे या परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले होते. वन विभागाने देखील त्याची दखल घेतली होती.

तोंडली वारेली गावाच्या सीमेवर आशिष शरद महाजन यांचे एकच घर आहे. पुणे येथून येऊन महाजन यांनी हे घर बांधले असून ते एकटेच या घरात राहतात. शनिवारी देखील ते एकटेच घरात होते. रात्री जेवण झाल्यानंतर ते नेहमीप्रमाणे झोपी गेले. गावच्या सीमेवर एकच घर आणि आजूबाजूला जंगल असल्याने ते नेहमीच स्वतःच्या संरक्षणासाठी बॅटरी, काठी, सर्प मारण्याचे कावेरू असे साहित्य जवळ बाळगून असायचे. त्या रात्री देखील असे साहित्य त्यांच्या जवळ होते. शनिवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास महाजन यांच्या घराजवळ कुत्रे भुंकायला लागले.

कुत्र्यांचा आवाज भयंकर वाढला. त्यामुळे एका हातात बॅटरी व दुसऱ्या हातात कावेरू घेऊन आशिष महाजन बाहेर आले आणि समोरचा दरवाजा उघडताच समोरून बिबट्याने थेट त्यांच्यावर हल्ला चढवला. आशिष महाजन ही तात्काळ सावध झाले. हातातील कावेरू ने त्यांनी बिबट्याला प्रतिकार करण्यास सुरुवात केली. बिबट्या एकामागून एक जोरदार हल्ले चढवत होता, तर स्वतःला वाचवण्यासाठी व बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी आशिष महाजन देखील जोरदार झटापट करत होते. एकबाजूने प्रहार तर दुसऱ्या बाजूने प्रतिकार असा थरार तब्बल दोन तास रंगला होता. आशिष महाजन यांनी स्वतः च्या बचावासाठी आरडाओरडा केल्यानंतर काही लोक तेथे धावून आले. त्यांनी देखील आरडाओरडा सुरू केला. मात्र बिबट्या मागे हटण्यास तयार नव्हता.

बिबट्याने महाजन यांचे पाय, हात, छाती आणि चेहऱ्यावर देखील जबरदस्त असे प्रहार केल्याने आशिष महाजन गंभीर जखमी झाले. अक्षरशः रक्तबंबाळ झाले. अशाही परिस्थितीत त्यांनी धैर्याने प्रतिकार केला. शेवटपर्यंत त्यांनी अतिशय कडवी झुंज दिली. या झटापटीत बिबट्या देखील जखमी झाला. थकला, हडबडला, भुकेने व्याकुळ झाला आणि अखेर जमिनीवर पडला. त्याच्यात जणू त्राण नव्हते. काही वेळेतच त्याने प्राण सोडले.

Web Title: Leopard attack on the border of Tondaligaon in Chiplun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.