बोरज येथील पऱ्यात रसायन सोडले

By Admin | Updated: July 11, 2014 00:17 IST2014-07-11T00:13:07+5:302014-07-11T00:17:28+5:30

ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांमुळे ही बाब उघड

Leaving Chemistry at Borj | बोरज येथील पऱ्यात रसायन सोडले

बोरज येथील पऱ्यात रसायन सोडले

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील बोरज पाखाडीचा पऱ्या येथे रसायन वाहून नेणाऱ्या एका टँकरमधून रसायन सोडण्याचे काम खुलेआमपणे सुरु होते. ग्रामस्थ व मनसेच्या कार्यकर्त्यांमुळे ही बाब उघड झाली.
पाखाडीचा पऱ्या या ठिकाणी रंग तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सोडून देण्यात येत होते. संबंधित टँकरचा चालक पाखाडीचा पऱ्या येथे टँकर उभा करुन पाईपद्वारे टँकरमधील रसायन सोडत होता. यावेळी हे कोणते रसायन आहे, काय आहे, याबाबत विचारता पोलिसांनी या रसायनाचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, या टँकरच्या चालकाला ताब्यात घेतले आहे असे सांगितले.
लोटे औद्योगिक वसाहत ही रासायनिक कारखाने असलेली वसाहत आहे. दाभोळ खाडीत घातक रसायनामुळे मासे मेल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. पावसाळ्याच्या दरम्यान ही घटना घडली असताना हे घातक रसायन पाखाडीच्या पऱ्याच्या खालील बाजूस असलेल्या शेतीलादेखील घातक ठरणार आहे. नजीकच असलेल्या बोरज धरण परिसरातील पाण्यातदेखील हे रसायन मिसळण्याचा धोका आहे. मात्र, हे रसायन सोडणाऱ्या चालकाला टँकरसह पकडण्यात आल्यामुळे चौकशी सुरु आहे. याप्रकरणी संबंधित वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभव खेडेकर, नाना चाळके, पुष्पेंद्र दिवटे, पोलीसपाटील प्रथमेश घोसाळकर, सतीश शिंदे, अशोक शिंदे, संजय चिनकटे, उदय घोसाळकर, दिलीप घोसाळकर, सुरेश मोरे, राजेंद्र घोसाळकर यांच्यासह ग्रामस्थ व मनसेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. बोरज येथील पाखाडीचा पऱ्या येथे ता.२६ डिसेंबर २००९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास असेच रसायनयुक्त पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लगतच असलेल्या बोरज धरणातील पाणी दूषित झाले होते. मोठ्या प्रमाणात पाण्यातील जलचर मृत्यूमुखी पडले होते. परंतु यावेळी देखील अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकाराची आज पुनरावृत्ती झाली असती. परंतु ग्रामस्थ व मनसेचे कार्यकर्ते यांच्यामुळे हा प्रकार टळला असल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Leaving Chemistry at Borj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.