देवगडात २१ दिवसांच्या बाप्पाला निरोप
By Admin | Updated: September 18, 2014 23:21 IST2014-09-18T22:04:38+5:302014-09-18T23:21:46+5:30
पोलीस कर्मचारी, त्यांच्या कुटुुंबियांसह देवगडमधील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

देवगडात २१ दिवसांच्या बाप्पाला निरोप
जामसंडे : देवगड पोलीस कर्मचाऱ्यांच्या गणरायाचे गुरूवारी एकविसाव्या दिवशी वाजतगाजत भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले. गुरूवारी रात्री उशिरा देवगडच्या खाडीमध्ये हे विसर्जन करण्यात आले. यावेळी पोलीस कर्मचारी, त्यांच्या कुटुुंबियांसह देवगडमधील ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
गणेश चतुर्थीनंतरच्या या एकवीस दिवसांच्या कालावधीमध्ये देवगडच्या जुन्या पोलीस स्थानकामध्ये विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या दिवसांमध्ये जिल्ह्यातील भजने, महिलांची भजने, फुगड्या, सत्यनारायणाची पूजा, महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुरूवारी सायंकाळी मोठ्या भक्तीभावाने गणरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर देवगड बाजारपेठमार्गे किल्ला येथे वाजतगाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढून श्रींची मूर्ती नेण्यात आली.
या प्रवासादरम्यान देवगडमधील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी श्री गणेशाची मनोभावे पूजा केली. त्यानंतर देवगड किल्ला येथील मारूती मंदिर परिसरामध्ये गणरायाची मूर्ती नेऊन तेथून पुढे खाडीमध्ये तिचे विसर्जन करण्यात आले. (वार्ताहर)