पाण्याच्या लाईनला गळती

By Admin | Updated: October 18, 2015 23:59 IST2015-10-18T22:06:00+5:302015-10-18T23:59:27+5:30

गुहागर नगरपंचायत : वाढीव पाईपलाईनचे काम रेंगाळले

Leakage of the water line | पाण्याच्या लाईनला गळती

पाण्याच्या लाईनला गळती

गुहागर : नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात जनतेला ठरलेल्या वेळेत आवश्यक पाणी पुरवठा करण्याकरिता नळपाणी योजनेच्या वाढीव पाईपलाईन जोडणीचे काम मोठ्या दिमाखात सुरू झाले. परंतु, ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे कामाची मुदत संपूनही काम पूर्ण न झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यातच वारंवार फुटणाऱ्या पाईपलाईनमुळे आज पाणी मिळेलच याचा भरवसा नाही. यामुळे नक्की हे काम जनतेसाठी की ठेकेदारासाठी असा सवाल केला जात आहे.गुहागर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्याने गुहागर शहरात मोठ्या प्रमाणात कामे होतील. एवढेच नव्हे; तर विकासाच्या वेगाबरोबर कामाचाही वेग वाढेल, असे चित्र जनतेच्या डोळ्यासमोर उभे करण्यात आले. परंतु, पाईपलाईन जोडणीच्या कामाकडे पाहून कामाच्या गतीचा अनुभव सध्या नगरपंचायत कार्यक्षेत्रातील जनतेला येत आहे. गुहागर शहराचा विस्तार वाढत आहे. भविष्यकाळात नळपाणी पुरवठा योजनेद्वारे होणाऱ्या पाण्याच्या मागणीत वाढ होणार आहे. याकरिता आवश्यक ठिकाणी निर्धारित वेळेत जनतेला पाणी मिळण्यासाठी अनेक ठिकाणी वाढीव पाईपलाईन जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एमजीपाच्यावतीने या वाढलेल्या पाईपलाईनचे काम करण्यात येत आहे. तब्बल ५१ लाख ५१ हजार ७०० रुपये खर्चाचे काम आहे. असगोली, कीर्तनवाडी, शिवाजी चौक, खरे-ढेरे महाविद्यालयासमोर पाईपलाईन वाढवण्याच्या कामाचे नियोजन आहे. पूर्वीची पाईपलाईन ही कास्टिंग तसेच सिमेंट पाईपलाईनची आहे. आता वाढवण्यात येणारी पाईपलाईन ही एसडीबी पाईपची आहे. त्यामुळे पाईपची सांधे जोडणी करण्याकरिता इलेक्ट्रिक उपकरणाचा वापर केला जात आहे. पाईपलाईनसाठी मोठ्या प्रमाणात चर खोदण्यात आले. पाईपलाईनची सांधे जोडणीही केली. परंतु ही सांधेजोडणी निकृष्ट पद्धतीने केल्याने मुख्य पाईपलाईन फुटण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातेच, शिवाय जनतेला नळपाणी पुरवठा योजनेतून चिखलयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नगरपंचायतीने शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे जनतेला आश्वासन दिले अहे. मात्र, प्रत्यक्षात चिखलयुक्त पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा, यासाठी ओरड सुरू आहे. यातच पाईपलाईन फुटल्याने आज पाणी मिळेल, याची शाश्वती राहिली नाही.
पाईपलाईनवर मीटर बसवण्याचे नियोजन नगरपंचायतीने केले आहे. परंतु जनतेला अर्धा ते पाऊण तास मिळणारे पाणीही वेळेत मिळत नाही. मग मीटर बसवून जनतेच्या पाण्याची व्यवस्था होईल का? आज दापोली व चिपळूण येथील पाण्यावर बसवण्यात आलेले मीटर अपयशी ठरले आहेत. सुदैवाने मोडकाआगर येथील धरणामुळे गुहागरवासीयांना पाण्याचे दुर्भिक्ष्य नाही. तरीही मीटर बसवण्याची घाई खरोखर जनतेच्या हितासाठीच का? असा सवालही उठत आहे. (प्रतिनिधी)


कामाची सहा महिन्यांची मुदत संपली
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून देण्यात आलेल्या ठेक्याची मुदत सहा महिन्यांची असल्याचे या कामावर तांत्रिक मार्गदर्शन करणारे अहमद मुल्ला यांनी सांगितले. ठेकेदाराने वाढीव मुदत मागितली तर त्याला एकदा देता येते. वारंवार वाढीव मुदत देता येत नाही. तसेच अर्धवट कामामुळे दरदिवशी दंड स्वरूपात कर आकारणी ठेकेदारावर केली जाते, असे सांगितले. मात्र, ठेकेदारावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. या कामामध्येच अनेक त्रुटी आहेत. हे काम जनतेच्या हितासाठी की, ठेकेदाराच्या फायद्यासाठी असा सवाल निर्माण होत आहे. या रेंगाळलेल्या कामाकडे नगरसेवकांनी लक्ष घालावे.

Web Title: Leakage of the water line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.