लोटेत वायूगळती; नऊजणांना बाधा
By Admin | Updated: May 17, 2015 01:32 IST2015-05-17T01:32:03+5:302015-05-17T01:32:03+5:30
नऊ तरुणांना बाधा

लोटेत वायूगळती; नऊजणांना बाधा
आवाशी : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लिटमस आॅरगॅनिक प्रा. लि. या कंपनीत शुक्रवारी सायंकाळी वायूगळती होऊन शेजारी खेळणाऱ्या चाळकेवाडीतील नऊ तरुणांना बाधा झाली. ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली.
वसाहतीतील अॅक्मे रसायनाचे उत्पादन घेणारी लिटमस आॅरगॅनिक कंपनी मागील दहा ते बारा वर्षांपासून कार्यरत आहे. शुक्रवारी मधल्या पाळीत उत्पादनाचे काम सुरू असताना एफबीडीच्या ट्रायरचे तापमान वाढल्याने तो फाटला व वायू परिसरात सर्वत्र पसरला. यावेळी कंपनीत लॅब असिस्टंट जितेंद्र चव्हाण यासह अविनाश सकपाळ, किरण गांधी, अनंत कुंभार हे चारजण काम करीत होते.
वायूगळती झाल्याने शेजारील मैदानावर क्रिकेट खेळणारे सुरत तटेकर, सौरभ चाळके, विनीत तावडे, निखिल तावडे, रवींद्र गजमल, अंकित इंगळे, नितीन कुळे, ओंकार चाळके, कल्पेश कुळे यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यांनी ग्रामस्थांसह तत्काळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला माहिती दिली. लागलीच मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी व्ही. जी. भताणे व अभिजित कसबे यांनी कंपनीत भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला. मात्र, कुणीही जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्याने त्यांनाही समर्पक उत्तरे व कारणे उपलब्ध होऊ शकली नाहीत. मात्र, तरीही संबंधित अधिकाऱ्यांनी यावेळी हा पंचनामा वरिष्ठांकडे सादर करून कंपनीवर कारणे दाखवा अथवा बंदची कारवाई होण्याचे संकेत दिले. यावेळी गावातील सचिन शिंदे, संभाजी कदम, रोहित चाळके, सुयोग चाळके, राजेंद्र शिंदे, संदीप चाळके, दिनेश चाळके, मीलन सुलेबावकर, प्रवीण सुलेबावकर, नितीन खरात, रवींद्र कुळे, रवींद्र गजमल, नारायण कुळे हे ग्रामस्थ उपस्थित होते. सुदैवाने कोणालाही रुग्णालयात नेण्याची वेळ आली नाही. (वार्ताहर)