लोटे पंचक्रोशी तहानलेलीच!
By Admin | Updated: October 6, 2015 00:41 IST2015-10-05T21:58:31+5:302015-10-06T00:41:37+5:30
घशाला कोरड : बारा गावांना पाणीच नाही

लोटे पंचक्रोशी तहानलेलीच!
आवाशी : लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीसह एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून असणारी बारा गावे अर्थात लोटे पंचक्रोशी गेल्या चार दिवसांपासून तहानलेली आहे. घशाला कोरड पडली तरीही पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने एमआयडीसीचे दुर्लक्ष होत असल्याची प्रतिक्रिया वसाहतीतून उमटत आहे.महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवार, दि. १ रोजी दुपारनंतर पाऊस पुन्हा सक्रिय झाला. विजांच्या कडकडाटासह ठिकठिकाणी वीज कोसळणे, वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडणे अशा घटना घडल्या. चिपळूण शहरात तर काही घरातून पाणी शिरले. मात्र जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. असे असतानाच लोटे - परशुराम औद्योगिक वसाहत व परिसरातील गावातून शुक्रवारपासून पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही.
येथील बारा गावांना एमआयडीसीकडूनच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असतो. या गावातील नैसर्गिक स्रोत रासायनिक प्रदूषणामुळे निकामी व दूषित झाल्याने एमआयडीसीच्या पाण्याखेरीज कुठलाही पर्याय उपलब्ध नाही. कदाचित किरकोळ तांत्रिक बिघाड वा वीजपुरवठ्याच्या अभावामुळे एक दिवस पाणी नसले तरी उद्या येईल, या आशेवर वसाहतीसह महिलावर्ग वाट पाहात राहिला. मात्र, रविवारपर्यंत पाणीच उपलब्ध नसल्याने हॉटेल व्यावसायिक, टपरीधारक, परप्रांतातून आलेले वाहनचालक, वाहक यांची फार कुचंबणा झाली. गावातील महिलांनी पावसाचे पाणी साठवून ते उकळून पिण्यासाठी वापरले तर काहींनी बोअरिंग वा टँकरचा आधार घेतला. याबाबत एमआयडीसीकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कार्यालयातील दूरध्वनीवर कुणीही उपलब्ध होऊ शकला नाही, तर भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही. मात्र, पीरलोटे येथील पाणी शुद्धीकरणावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता दुपारी पाणी सुरु केले असून, सायंकाळपर्यंत ते पूर्ववत होईल, असे सांगितले. मात्र, पाणीपुरवठा नेमका का पाणी खंडित केला, याचे उत्तर त्याने दिले नाही. (वार्ताहर)
शुक्रवारपासून पिण्याचे पाणीच नसल्याने गैरसोय.
पाणी सुरु करण्यात आल्याचे कर्मचाऱ्याचे म्हणणे.
पाणीपुरवठा खंडित का झाला? याचे कारण गुलदस्त्यात.
बोअरिंग, टँकरचा अनेकांनी घेतला आधार.